
>>विशाल अहिरराव
कॉफी… जगभरातील प्रसिद्ध उत्तेजक पेय आहे. हिंदुस्थानातही कॉफीप्रेमींची कमी नाही. चहापाठोपाठ क्रमांक लागतो तो कॉफीचा, मात्र कॉफीतून कॅफेन तयार होऊन मज्जातंतूंवर त्याचा परिणाम होतो. अशा वेळी कॉफीला पौष्टिक पर्याय द्यायचा असेल तर त्यासाठी अंबाडी किंवा भेंडीच्या बियांपासून केलेली कॉफी आता बाजारात उपलब्ध झाली आहे. धुळ्याच्या नांद्रे येथील तरुणी प्रांजली बोरसे हिनं हा प्रयोग प्रत्यक्षात आणून अंबाडी, भेंडी अशा दोन पिकांच्या बियांपासून तयार होणारी कॉफी उपलब्ध करून दिली आहे. ‘यज्ञांग कॉफी’ या नावानं ही कॉफी सध्या प्रसिद्ध आहे.
कॉफीप्रमाणेच याला सुगंध येतो, चव लागते, केवळ कॉफी एवढी स्ट्राँग नसते, मात्र मनाला ताजेपणा आणि उत्साह मिळतो. पचनशक्ती चांगली करते, किडणीच्या विकारांवरदेखील ती उपयोगी ठरते. सध्या मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर या अंबाडी, भेंडीची कॉफी विक्री केली जात आहे.
लाल अंबाडीच्या बियांच्या कॉफीचा दर प्रति किलो मागे हजार रुपये अशी आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या कॉफीच्या तुलनेत याची किंमत हजार-दीड हजारानं कमी असल्याने सर्व दृष्टीनं ही अंबाडी, भेंडीची कॉफी फायदेशीर ठरू शकते. टेरेस शेतीचा ट्रेंड सध्या वाढत आहे. अशा वेळी घरच्या घरी कॉफीचं उत्पन्न घेऊ शकतो.
यासंदर्भात माहिती देताना प्रांजली बोरसे म्हणाली, पारंपरिक शेतीसोबतच काही प्रयोगात्मक काही करायचं असा माझा उद्देश होता. त्यानुसार इंटरनेटवरच्या माझ्या शोधातून मला या कॉफीची कल्पना मिळाली, पण महाराष्ट्रात तसा प्रयोग पुणी केला आहे का ते कळत नव्हतं. म्हणून आमच्या घरच्या शेतात मी हा प्रयोग केला आणि यशस्वी झाले. त्यामुळे अंबाडीच्या बियांपासून मी कॉफी तयार करून विक्री सुरू केली. ‘दुसऱया महायुद्धाच्या काळात युरोपात कॉफी पोहोचत नव्हती. तेव्हा कॉफीला पर्याय म्हणून भेंडीची बी वापरण्यात आल्याचंही प्रांजलीनं सांगितलं. कॉफीच्या बियांप्रमाणेच अंबाडीच्या बिया भाजून मग त्या ग्राइंड करून वेलदोडा, जायफळ घालून त्याची कॉफी बनवण्यात येते. ही कॉफी अपायकारक नसून शरीरासाठी अधिक फायद्याचीच असल्याचं तिनं सांगितलं.





























































