पुणे – दुचाकीच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव दुचाकीस्वार रिक्षावर आदळून झालेल्या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज भागात घडली. अपघातात दुचाकीस्वारासह रिक्षातील सहप्रवासी जखमी झाले. आशिष तानाजी खवले (वय 32, रा. वेळू, ता. भोर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी ऋषीकेश खवले यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

खवले यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून वेळू (ता. भोर) गावातून ते मार्केटयार्डातील घाऊक बाजारात भाजी विक्रीस पाठवितात. गुरूवारी पहाटे आशिष, ऋषीकेश आणि मित्र सागर पहाटे साडेतीनच्या सुमारास रिक्षातून भाजीपाला घेऊन मार्केटयार्डात निघाले होते. त्यावेळी कात्रज घाट उतरल्यानंतर मांगडेवाडी परिसरात समोरून भरधाव वेगाने आलेला दुचाकीस्वार रिक्षावर आदळला. अपघातात रिक्षाचालक आशिष खवले, ऋषीकेश, मित्र सागर जखमी झाले तसेच दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. पोलिसांनी चौघांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वी रिक्षाचालक आशिष खवलेचा मृत्यू झाला.