
अफगाणिस्तानची राजधानी काबूल विमानतळाजवळ रविवारी रॉकेट हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. विमानतळाजवळील गुलाई या भागात एका घरावर हे रॉकेट आदळले. या हल्ल्यात एका बालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
तीन दिवसांपूर्वी राजधानी काबूल साखळी स्फोटांनी हादरली होती. गुरुवारी काबूल विमानतळाजवळ एकापाठोपाठ एक असे तीन स्फोट झाले होते. ज्यामध्ये 169 अफगाण नागरिक आणि 13 अमेरिकन सैनिकांना आपला जीव गमवावा लागला.
तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काबूलमध्ये पुन्हा स्फोट होण्याची भीती असल्याचे सांगितले होते. अमेरिकेने आपल्या नागरिकांना काबूल विमानतळापासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. या रॉकेट हल्ल्यानंतर विमानतळाजवळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

























































