
वापरलेली जुनी कार खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन भामट्यांनी कारच्या टेस्ट ड्राईव्हचा बहाणा करून चाकूचा धाक दाखवत कार लंपास केली. या भामट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल 65 किलोमीटर पाठलाग करून बेड्या ठोकल्या. ही घटना आज बुधवारी दुपारी घडली असून, या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहेमानियाँ कॉलनी येथील फैसल रफिक सय्यद (24), रोशनगेट परिसरातील सय्यद अरबाज सय्यद आरेफ हे दोघे भामटे टीव्ही सेंटर परिसरातील गुलाब विश्व हॅालजवळ असलेले वैष्णवी जुने वाहन खरेदी-विक्री सेंटरमध्ये बुधवारी सकाळी खरेदी करण्याचा बहाणा करत आले होते. यावेळी त्यांनी एक कार पसंत करून ट्रायल घ्यायची असे सांगून विक्री सेंटरचा एक कर्मचारी सोबत घेऊन जालना रोडवरून बाबाच्या दिशेने कार घेऊन निघाले.
65 किलोमीटर पाठलाग करून दोघांना पकडले
आदालत रोडवरील चुन्नीलाल पेट्रोलपंपाजवळ आल्यावर सोबत आलेल्या कर्मचाऱ्यास चाकूचा धाक दाखवून खाली उतरविले आणि कार घेऊन बाबाच्या दिशेने पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त रवींद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित कारचा शोध घेतला असता ती कार नगरच्या दिशेने गेल्याचे लक्षात आले. गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्ता शेळके, गोकुळ ठाकूर, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, किरण गावंडे, संजयसिंग राजपूत, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड यांनी पाठलाग करून पुरणगावजवळ कार बाजूच्या शेतात घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. माञ पोलिसांनी दोघांना जेरबंद करून जिन्सी पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



























































