हुश्श..! अखेर रोहित शर्माने शतक झळकावलं, विदेशात पहिल्यांदाच गाठला हा पल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या कसोटीवर हिंदुस्थानने पकड मजबूत केली आहे. सलामीवीर खेळाडू रोहित शर्मा याने नाबाद शतकी खेळी केली असून चेतेश्वर पुजारा अर्धशतकाच्या जवळ आहे. रोहित शर्मा याने पहिल्यांदाच विदेशामध्ये शतकाला गवसणी घातली आहे.

रोहित शर्मा याने 2013 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने सात शतकं झळकावली होती, मात्र ही सर्व शतकं त्याने मायदेशात झळकावली होती. विदेशामध्ये शतक झळकावण्यापासून तो वंचित होता. लॉर्डस कसोटीमध्ये तो शतकाच्या जवळ पोहोचून बाद झाला होता. मात्र ओव्हल कसोटीमध्ये मोक्याच्या क्षणी रोहितने शतकी खेळी केली.

कसोटी क्रिकेटमध्ये आता रोहित शर्माच्या नावापुढे 8 शतकांची नोंद झाली आहे. तसेच ओव्हलवरील शतकी खेळीदरम्यान त्याने कसोटी कारकिर्दीतील 3 हजार धावांचा टप्पाही पार केला. 43 व्या कसोटीमध्ये त्याने हा पल्ला गाठला.

एक दिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर 227 लढतीत 10 हजार 354 धावांची नोंद आहे. यात त्याच्या 29 शतकांचा समावेश आहे. एक दिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकण्याची कामगिरी त्याने तीन वेळा केली आहे. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 111 लढतीत 4 शतकांसह 2 हजार 61 धावांची नोंद आहे.