बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पिकांची वाताहत, 22 गावांचा संपर्क तुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस वाताहत करत आहे. मंगळवारी सकाळपासूनच नॉन स्टॉप पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो, वाहतुकीची पुलं पाण्याखाली, नद्यांना पूर, साठवण तलाव खचाखच भरले आहेत. खरिप हंगाम धोक्यात आला आहे. बीड जिल्ह्याची वाटचाल ओल्या दुष्काळाच्या दिशेने सुरू आहे.

बीड जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळपासूनच नॉन स्टॉप पावसाने सुरूवात केली आहे. सोमवारी रात्रीही अनेक भागामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसाने बीड जिल्ह्याची दाणादाण उडवून दिली आहे. गेवराई तालुक्यातील गोदाकाठावर असणाऱ्या 45 गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोदाकाठाच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे.

माजलगावचे धरण कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केज तालुक्यातील मांजरा प्रकल्पातील पाणीपातळी 50 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. बीड जिल्ह्यातील सर्वच लगु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. साठवण तलाव खचाखच भरले आहे. असंख्य वाहतुकीची पुलं पाण्याखाली आहेत. अंबाजोगाई तालुक्यात जोरदार पावसाने वाहतूक विस्कळीत झाली आहे. कन्हेरवाडी येथील पुलावरून पाणी असल्याने परळी-अंबाजोगाई रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कुंडलिका, बिंदुसरा, मणकर्णिका नद्यांना पुन्हा एकदा पूर आला आहे.

खरिप पिकांची वाताहत

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वार्षिक सरासरी ओलांडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्याची वाटचाल ओल्या दुष्काळाकडे आहे. कापूस, सोयाबीन, बाजरीचे पीक जमिनदोस्त झाले आहेत. जिल्हाभरातील शेतीची अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, पावसाचे पाणी जमिनीत घुसले आहे.

डोंगरपट्ट्यातील 22 गावांचा संपर्क तुटला

रविवार, सोमवार आणि मंगळवार तीन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सखल भागासह डोंगराळ भागातीलही वाताहत झाली आहे. डोंगरपट्ट्यातील तब्बल 22 गावांचा संपर्क तुटला आहे. अतिशय उंचावरून वाहणारा वडवणी-धारूर रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

वडवणी आणि धारूर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बालाघाट डोंगरावर असणाऱ्या 22 गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. वडवणी आणि धारूर रस्ता पाण्याखाली गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आला आहे. वडवणी आणि धारूर तालुक्यात खरीप पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. रस्त्याला नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.