INDvENG रोहितचं शतक म्हणजे टीम इंडियाच्या विजयाची गॅरंटी, जाणून घ्या खास आकडेवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात लंडनच्या ओव्हल मैदानावर चौथा कसोटी सामना खेळला गेला. या लढतीत हिंदुस्थानने यजमान इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात 127 धावा करत दमदार शतक ठोकणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

ओव्हलच्या मैदानावर रोहित शर्माने कारकिर्दीतील आठवे शतक ठोकले, तर विदेशातील हे त्याचे पहिलेच शतक होते. याआधी त्याने झळकावलेली सात शतके हिंदुस्थानमधील होती. विशेष म्हणजे कसोटी लढतीत रोहित शर्मा याने जेव्हा शतक ठोकले आहे, तेव्हा हिंदुस्थानचा विजय झाला आहे. याचाच अर्थ रोहित शर्माचे शतक हिंदुस्थानच्या विजयाची गॅरंटी बनले आहे.

रोहित शर्मा याने आपले पहिले शतक वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले होते. या लढतीत त्याने 177 धावांची खेळी केली होती. हा सामना हिंदुस्थानने जिंकला होता. रोहितने दुसरे शतकही वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले होते. त्याच्या नाबाद 111 धावांच्या खेळीच्या बळावर हिंदुस्थानने विजय मिळवला होता.

रोहितने आपले तिसरे शतक श्रीलंकेविरुद्ध ठोकले होते आणि नाबाद 102 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. यानंतर चौथे शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावले. 176 धावांची खेळी करत हिंदुस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

रोहितने आपले पाचवे शतकही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ठोकले होते आणि 127 धावांची खेळी करत संघाला विजयी केले. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 212 धावांची खेळी करत सहावे शतक ठोकले आणि संघाला विजयी केले.

रोहितने इंग्लंडविरुद्ध 161 धावा चोपल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. हे त्याचे सातवे शतक होते. ही सातही शतके त्याने हिंदुस्थानमध्ये ठोकले होती. यानंतर रोहितने ओव्हलमध्ये 127 धावांची खेळी केली आणि संघाला विजयी केले.