
जर्मन डेटाबेस कंपनी स्टेटिकाकडून जगातील सर्वाधिक सैन्य असलेल्या देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत चीन पहिल्या स्थानी आहे. तर हिंदुस्थान दुसऱ्या स्थानावर आणि अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे. या अहवालात ब्रिटनच्या सैन्यसंख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
चीन सीमावर्ती भागात सैनिकांची कुमक वाढवत आहे. तर दुसरीकडे नवनवीन देशांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे. चीनकडून मागील काही वर्षात संरक्षण क्षेत्रातील खर्चही वाढवण्यात आला होता. एका पाहणीनुसार चीनकडे जगातील सर्वाधिक सैन्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.
स्टेटिकाच्या यंदाच्या अहवालानुसार चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी हे जगातील सर्वात मोठे सैन्य आहे. वर्ष 2019 मध्ये चीन सैन्यामध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांची संख्या 21 लाख 85 हजारांच्या घरात आहे. चिनी सैन्य पाच विभागांमध्ये विभागले गेले आहे. यामध्ये भूदल, हवाई दल, नौदल, रॉकेट फोर्स, स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स यांचा समावेश आहे. चिनी लष्कर पाच थिएटर कमांडमध्ये काम करते.
सर्वाधिक सैन्यांच्या यादीत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर हिंदुस्थान आहे. हिंदुस्थानातील एकूण नोंदणीकृत सैन्यात कर्मचाऱ्यांची संख्या 14 लाख 45 हजारांच्या घरात आहे. यामध्ये लष्कर, हवाई दल आणि नौदलाचा समावेश आहे. त्याशिवाय हिंदुस्थानकडे जगातील सर्वात मोठी पॅरामिलिटरी आहे. यामध्ये सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल केंद्रीय औद्योगिक पोलीस दल, सशस्त्र सीमा दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस, एनएसजी, एसपीजी आदींचा समावेश आहे.
सैनिकांच्या संख्येत अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्या जवानांची संख्या 14 लाख आहे. चीन, हिंदुस्थान, अमेरिका उत्तर कोरिया, रशिया, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, इराण, व्हिएतनाम आणि सौदी अरेबिया या देशांकडे सर्वाधिक सैन्य आहे. या विश्लेषणानुसार बांगलादेश हा खालच्या स्थानावर असून त्यांच्याकडे दोन लाख सैन्य आहे.
ब्रिटनकडे इजिप्त,म्यानमारपेक्षाही कमी सैन्य
या यादीत ब्रिटनच्या सैनिकांच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ब्रिटनचा सैन्य आकार हा इजिप्त, म्यानमार, इंडोनेशिया, थायलंड आणि तुर्कीसारख्या देशांपेक्षा कमी आहे. फ्रान्सकडे ब्रिटनपेक्षा अधिक सैन्य आहे.




























































