घरफोडी करणाऱ्या सराईताला अटक; 4 लाखांचा ऐवज जप्त, गुन्हे शाखा दोनची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागातील बंद घरांची रेकी करून घरफोडी करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखा दोनने अटक केली. त्याच्याकडून चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रफीक हुसेन शेख (वय 26, रा. सय्यद नगर, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कारागृहातून जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने वाहनचोरीसह घरफोडी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

गुन्हे शाखा युनीट दोनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे पथकासह हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी सराईत गुन्हेगार रफीक शेख के. के. मार्केट परिसरात थांबला असून तो घरफोडी करण्यासाठी जात असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस अंमलदार गजानन सोनुने आणि कादीर शेख यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून रफीक शेख याला ताब्यात घेतले. त्याने वाहनचोरीसह घरफोडीचे प्रत्येकी दोन गुन्हे केल्याची कबुली दिली.

आरोपी शेख काही दिवसांपूर्वीच जेलमधून जामिनावर बाहेर आल्यावर त्याने वाहनचोरीसह घरफोडीचे गुन्हे केले आहेत. त्याच्यावर तब्बल 36 गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, एपीआय प्रकाश मोरे, यशवंत आंब्रे, किशोर वग्गु, उत्तम तारू, चंद्रकांत महाजन, गजानन सोनुने, निखिल जाधव, कादीर शेख, समीर पटेल, करण ढंगारे, साधना ताम्हाणे यांनी केली.