पुण्यात पिस्तूलांचा बाजार करणारे सराईत अटकेत, तीन पिस्तूल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरात गावठी पिस्तूलांची विक्री करणाऱ्यासह विविध गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या सराईतांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत. वाळू व्यावसायिकावर गोळीबार करणे, कंपनीची रोकड लुटण्याचे गुन्हे आरोपींविरूद्ध आहेत. यापूर्वी त्यांच्याकडून तब्बल 11 पिस्तूल जप्त करण्यात आली होती. राजु अशोक जाधव व प्रमोद ऊर्फ बारक्या श्रीकांत पारसे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वानवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पिस्तूल बाळगणारे सराईत हडपसरमधील काळेपडळ परिसरात असल्याची माहिती पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने राजू आणि प्रमोदला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली.

दरम्यान, पोलीस कोठडीत असताना अधिक तपासात पोलिसांनी राजू जाधव याच्याकडून आणखी दोन पिस्तूले जप्त केली. त्यांच्याकडून यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातंर्गत 11 गावठी बनावटीची अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली होती.

आरोपींनी विक्री केलेल्या पिस्तूलांचा वापर करुन मोहम्मदवाडी परिसरातील एका वाळु विक्रेत्यावर गोळीबार करुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याशिवाय वेल्हा तालुक्यातील दोपोडे येथील व्यावसायिकावर गोळीबार केल्याचे तपासात उघड झाले आहे. जुलै महिन्यात दोघेही तात्पुरत्या स्वरुपात जामिनावर सुटले आहेत. त्याशिवाय त्यांनी लोणंद एम.आय.डी.सी. मधील एका कंपनीची 5 लाख रुपये रोकड लुटल्याची कबुली दिली. आरोपींनी बाळगलेली अग्निशस्त्रे ही ते कोणास देण्यास आले होते किंवा त्यांनी कोणाच्या खुनाची सुपारी घेतली आहे काय याप्रकरणी तपास सुरू आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड, पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर संतोष तानवडे, राजु रासगे, संतोष मोहिते, संजय बागल, अमजद पठाण, विनोद भंडलकर, संतोष नाईक, अतुल गायकवाड सर्फराज देशमुख, सागर जगदाळे, शिरीष गोसावी अमित चिव्हे, दिपक भोईर, गणेश खरात यांनी केली.