पुण्यात पोलीस शिपाई पदासाठी 5 ऑक्टोबरला होणार लेखी परिक्षा, 214 जागेसाठी तब्बल 39 हजारांवर अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे पोलिस आयुक्तालयातील रिक्त शिपाई पदासाठीची 5 ऑक्टोंबरला लेखी परिक्षा होणार आहे. पोलिस भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच लेखी परिक्षा अगोदर घेतली जाणार आहे. पुणे पोलिसांच्यावतीने खासगी यंत्रणेच्या माध्यमातून परिक्षा घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना 22 सप्टेंबरपासून हॉल तिकीट दिले जाणार आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर उपस्थित होते.

पुणे पोलिस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या 214 पोलिस शिपाई पदासाठी 2019मध्ये जाहिरात देण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे. त्यानुसार 214 पदांसाठी तब्बल 39 हजार 323 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पोलिस भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी परिक्षा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पहिल्यांदाच प्रत्येक घटकाला खासगी यंत्रणेमार्फत लेखी परिक्षा घेण्यास सूचित करण्यात आले होते. त्यानुसार पुणे पोलिस आयुक्तालयाची लेखी परिक्षा जी. एस. सॉफ्टवेअर कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.

पोलिस पदासाठी लेखी परिक्षा 5 ऑक्टोंबरला सकाळी 11 ते 12.30 दरम्यान होणार आहे. त्यासाठी उमेदवारांना 22 सप्टेंबरपासून इ-मेलवर हॉलतिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. परिक्षेत गैरप्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्ही, बायोमेट्रीक सुविधा, व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. शहरातील 143 केंद्रावर भरती परिक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी २ हजार १९८ ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. परिक्षेदरम्यान कोरोना नियमावलीचे पालन करण्यात प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनीकडून नियोजन करण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

असे करा हॉल तिकीट डाऊनलोड

परिक्षार्थी उमेदवरांना इमेलवर हॉल तिकीटची लिंक पाठवली जाणार आहे. त्याशिवाय ,  https#://mahapolicerc.mahaitexam.in/Phaseone या लिंकवर युझरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून हॉल तिकीट डाऊनलोड करा. त्याबरोबरच https#://mahapclicerc.mahaitexam.in/Phaseone याच लिंकवर डाउनलोड हॉल तिकीट या बटनावर क्लिक करून हॉलतिकीट डाउनलोड करावा. अ‍ॅपलिकेशन आयडी, आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख अर्जात भरल्याप्रमाणे टाकून हॉल तिकीट मिळवता येणार आहे. उमेदवारांना काही अडचण आल्यास 9699792230, 8999783728, 020-26122880 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अपर पोलीस आयुक्त डॉ. जालींदर सुपेकर यांनी केले आहे.