
>> नीलांबरी जोशी
‘‘आकाशापेक्षा अथांग’’ असं एमिली डिकनसन या कवयित्रीनं मेंदूचं वर्णन केलंय. या तीन पौंडाच्या मानवी अवयवाइतकी गुंतागुंतीची गोष्ट जगात नाही. आपल्या सर्व निर्णयांमागे, कृतींमागे, हालचालींमागे आपल्या अस्तित्वाला व्यापून टाकणारा मेंदू असतो. वयोमानानं, शारीरिक इजा झाल्यानं किंवा मानसिक विकारांमुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. अल्झायमर या विकारात मेंदूतल्या टिश्यूज झीज पावल्यानं किंवा त्यांना इजा झाल्यानं काम करेनाशा होतात. 21 सप्टेंबर रोजीच्या अल्झायमर दिनानिमित्त हा लेख…
सहजच समोर नजर जाते. दिवाणखान्यातल्या रॅकवर ठेवलेलं एक घडय़ाळ दिसतं. जरासं जुनाट भासणारं ते घडय़ाळ पाहून क्षणार्धात मन ज्या दुकानात ते घडय़ाळ घेतलं तिथे पोचतं.. “ऍंटिक लुक असणारं ते घडय़ाळ चालेल का? आता आपल्याकडे इतके पैसे नाहीत अशा वस्तूंची खरेदी करायला’’ असे संवाद आठवतात. नंतरच्या 40 वर्षांमध्ये ते घडय़ाळ टिकलं याचं अप्रूप मनात येतं आणि येणाऱयाजाणाऱयांनी त्या घडय़ाळाचं केलेलं कौतुक आठवतं. ओठांवर एक मंदस्मित तरळतं..
स्वयंपाकघरात चहा करायला यावं तर एक जरासा टवका गेलेला मग दिसतो. लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला नवऱयानं काहीच गिफ्ट आणलं नाही म्हणून हिरमुसल्यावर त्यानं हा फुलांच्या नक्षीचा मग दाखवल्यावरची डोळ्यातली चमक आठवते. पाच वर्षांपूर्वी गेलेल्या नवऱयाच्या आठवणीनं डोळ्यात पाणी तरळतं. आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात अशा आठवणी क्षणोक्षणी दाटत असतात. अनेक भावना आणि त्या भावनांच्या असंख्य छटांचा फेर आपल्याभोवती असतो, पण त्या सगळ्या आठवणी आहेत, आता ते घडत नाहीये याचं भान जागृत असतं. पण जर ते भान संपलं तर? आठवणी आहेत हे न समजता आपण त्या प्रसंगात, त्या काळात तिथे आहोत असं समजून भोवतालच्या लोकांशी तसं वागायला लागलो तर? मुलगी समोर असताना आपल्या मनात बालपण असल्यानं मुलीला आपण ओळखणारच नाही, खिडकीतून दिसणारं दृश्य अपरिचित भासेल आणि अस्तित्वाबद्दलच शंका निर्माण होतील. असं ज्यांना होतं आहे असे सुमारे साडेतीन कोटी लोक जगात आहेत. त्यांना ‘अल्झायमर’ या मेंदूच्या विकारामुळे स्मृतिभ्रंश झालेला आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. 2030 साली 6.6 कोटी लोकांना अल्झायमर असेल असा अंदाज आहे. ऍलॉईस अल्झायमर या जर्मन न्यूरोपॅथॉलॉजिस्टनं 1907 साली शोधून काढलेला हा आजार बरा होत नाही. हिंदुस्थानात आज सुमारे 45 लाख लोकांना अल्झायमर आहे. हा आकडा हिंदुस्थानात 2030 साली 75 लाखांपर्यंत पोचेल. हिंदुस्थान आज जगात अल्झायमरग्रस्त असलेल्या यादीत तिसऱया क्रमांकावर आहे.
आज चाळिशीत असलेली माणसं जर वयाच्या 85व्या वर्षापर्यंत जगली तर त्यांच्यातल्या दोन माणसांपैकी एकाला अल्झायमर असेल असं अनेक न्यूरोसायंटिस्ट मानतात. मेंदूतल्या बदलांमुळे होणाऱया या विकाराच्या संशोधनावर कॅन्सरच्या संशोधनावर होणाऱया खर्चाच्या तुलनेत 10 टक्केदेखील खर्च केला जात नाही ही खंत आहे. ‘‘आकाशापेक्षा अथांग’’ असं एमिली डिकनसन या कवयित्रीनं मेंदूचं वर्णन केलंय. या तीन पौंडाच्या मानवी अवयवाइतकी गुंतागुंतीची गोष्ट जगात नाही. आपल्या सर्व निर्णयांमागे, कृतींमागे, हालचालींमागे आपल्या अस्तित्वाला व्यापून टाकणारा मेंदू असतो. वयोमान, शारीरिक इजा, किंवा मानसिक विकारांमुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो.
अल्झायमर या विकारात मेंदूतल्या टिश्यूज झीज पावल्यानं किंवा त्यांना इजा झाल्यानं काम करेनाशा होतात. आपल्या शरीरातल्या सर्व पेशी, त्यांचं विभाजन होऊन वाढतात. याला फक्त मेंदूतल्या न्यूरॉन्सचाच अपवाद आहे. वयपरत्वे झिजणाऱया मेंदूतल्या पेशी आणि न्यूरॉन्स या परत नव्यानं तयार होत नाहीत. त्यामुळे अल्झायमरला वाढतं वय हे महत्त्वाचं कारण आहे.
अल्झायमरसारख्या विकारानंतर अनेक जणांना नैराश्य आणि चिंता या मनोविकारांना तोंड द्यावं लागतं. सुरुवातीला अल्झायमरमुळे कामात बारीकसारीक चुका होणं किंवा ठरावीक कामाला आधीपेक्षा जास्त वेळ लागणं ही लक्षणं दिसतात. नंतरच्या टप्प्यात मग स्मृतिभ्रंशाची लक्षणं दिसायला लागतात. अशावेळी अल्झायमर झालेली व्यक्ती दिशा सहज विसरू शकते, आपल्या शरीराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करते. अल्झायमरच्या रुग्णांमध्ये ‘आभासी मत्सर’ वाढतो. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीला अल्झायमर असेल ती आपल्याच वयाच्या (साधारणतः 60 वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या) जोडीदारावर व्यभिचाराचा सतत आरोप करायला लागते. तसंच घरातल्या लोकांनी आपल्या अन्नात विष मिसळलं असेल किंवा आपली पेन्शनची रक्कम लाटायची त्यांची योजना आहे अशा प्रकारचे त्यांना सतत संशय येतात. साधारणपणे वयाच्या 45व्या वर्षी अल्झायमर हा विकार होऊ शकतो. एखाद्या माणसानं एकदा चाळिशी गाठल्यानंतर अल्झायमर होण्याची शक्यता दर पाच वर्षांनंतर दुप्पट होत जाते. 60 ते 64 वयाच्या एक टक्का लोकांना हा आजार असला तरी 85 पेक्षा जास्त वयाच्या 40 टक्के लोकांना अल्झायमर असतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांना हा विकार होण्याची शक्यता किंचित जास्त असते. ज्यांना मनातून सतत एकटं वाटतं, त्यांना हा विकार होण्याची शक्यता दुप्पट असते. अतिधूम्रपान, शिक्षणाचा अभाव, आर्थिक परिस्थिती खालावलेली असणं आणि बेकारी ही कारणं अल्झायमरमागे सापडतात.
अल्झायमर झालेल्या व्यक्तीला पूर्वपदावर आणणारे उपचार अजून उपलब्ध नाहीत. जे उपचार उपलब्ध आहेत ते रुग्णाचा आणि त्याच्या कुटुंबाचा त्रास कमी करण्यासाठी दिले जातात. अल्झायमरवर ‘केअर गिव्हर्स’ हे काही ठिकाणी मदत करतात. समाजातल्या काही व्यक्ती पुढे येऊन अल्झायमरच्या रुग्णांना मदत करतात. मात्र अल्झायमरसाठी मदत करणाऱया या ‘केअर गिव्हर्स’पैकी 40 टक्के जणांना स्वतःलाच नैराश्य येतं. अर्थात, 74 टक्के केअर गिव्हर्स या विकाराच्या परिणामांना घाबरून स्वतःच्या प्रकृतीकडे पुरेसं लक्ष पुरवायला लागतात.
अल्झायमर या विकाराचे गंभीर परिणाम जाणवल्यामुळे या विषयावर अनेक चित्रपट निर्माण झाले. 2021 साली ऑस्कर पारितोषिक मिळालेला ‘द फादर’ हा चित्रपट अल्झायमर या विकाराभोवती फिरतो. ‘ब्लॅक’, ‘अस्तु’, ‘धूसर’, ‘थनामात्रा’, ‘माई’, ‘यू मी ऍंड हम’, ‘स्माईल प्लीज’ असे अनेक हिंदुस्थानी चित्रपटही या विषयावर आधारित आहेत. या चित्रपटांप्रमाणेच ‘थर्ड एज’, ‘ऍन अल्झायमर्स स्टोरी’, ‘लिव्हिंग वुईथ डिमेन्शिया’ या डॉक्युमेंटरीज गाजल्या होत्या.
महत्त्वाचं म्हणजे सुडोकू, शब्दकोडी सोडवणं, बुद्धिबळ खेळणं, रोज वाचन करणं, रोज काय घडलं ते रोजनिशीमध्ये लिहिणं, स्वतःच्या आयुष्याची कथा डायरीत टिपणं; चित्रकला, हस्तकला, विणकाम, भरतकाम, शिल्पकला, गायन किंवा वादन शिकणं, संगीताचे जलसे ऐकणं; नृत्य, नवीन भाषा, फोटोग्राफी, नवीन खाद्यपदार्थ शिकणं, बागकाम, नवीन तंत्रज्ञान, पक्षीनिरीक्षण अशांसारख्या नवीन गोष्टी शिकणं; रोज चालणं, योगा, प्राणायाम असे ठरावीक व्यायाम करणं; सामाजिक कार्यांमध्ये जमेल तसा हातभार लावणं; लोकांमध्ये मिळूनमिसळून राहणं; अधूनमधून प्रवास करणं अशा मेंदूला सतत कार्यरत ठेवणाऱया गोष्टी केल्यानं अल्झायमरचा धोका कमी होऊ शकतो. या विकाराला घाबरून जाण्यापेक्षा या यादीतले उपाय सुरू करणं हा 21 सप्टेंबर या जागतिक अल्झायमर दिनी योग्य संकल्प होऊ शकतो.





















































