
यूएई व ओमान येथे या वर्षी 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होणारे 16 संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. याप्रसंगी बीसीसीआयने मात्र 2022 सालामध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 वर्ल्ड कपची मोर्चेबांधणी करायला सुरू केली आहे. हिंदुस्थानात 2021 ते 2022 सालामध्ये होणाऱया आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांच्या वेळापत्रकाची घोषणा सोमवारी करण्यात आली. हिंदुस्थानचा संघ या वर्षी नोव्हेंबर ते पुढल्या वर्षी जून या कालावधीत तब्बल चार देशांना भिडणार आहे. तसेच या कालावधीत टीम इंडिया तब्बल 14 टी-20 सामने खेळेल. हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यामधील कसोटी सामन्याच्या आयोजनाचा मान मुंबईला मिळाला आहे.
मान्सून आगमनात क्रिकेटचा थरार
बीसीसीआयकडून सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकात एक बाब प्रकर्षाने दिसून आली. पुढल्या वर्षी हिंदुस्थानात मान्सून आगमनातही आंतरराष्ट्रीय लढत रंगणार आहे. हिंदुस्थान – दक्षिण आफ्रिका यांच्यामधील पाच टी-20 सामन्यांची मालिका 9, 12, 14, 17, 19 जून या कालावधीत होणार आहे. 2022 सालामध्ये ऑक्टोबर – नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठीच्या तयारीसाठी बीसीसीआयने जून महिन्यातही टी-20 मालिका खेळवण्याचा निर्णय घेतला असावा.
महाराष्ट्रात फक्त दोनच लढती
हिंदुस्थानचा संघ नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांच्या कालावधीत 21 आंतरराष्ट्रीय लढती मायदेशात खेळणार आहे. पण यापैकी फक्त दोनच लढतींच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला देण्यात आला आहे. हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यामधील 3 ते 7 डिसेंबर, 2021 या कालावधीत होणारा दुसरा कसोटी सामना मुंबईत होणार आहे. तसेच हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यामधील 14 जून रोजी होणारा तिसरा टी-20 सामना नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या दोन लढतींव्यतिरिक्त एकही आंतरराष्ट्रीय लढत महाराष्ट्रात होणार नाही.
हिंदुस्थान-न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक
पहिली टी-20 जयपूर (17 नोव्हेंबर, 2021)
दुसरी टी-20 रांची (19 नोव्हेंबर, 2021)
तिसरी टी-20 कोलकाता (21 नोव्हेंबर, 2021)
पहिली कसोटी कानपूर (25 ते 29 नोव्हेंबर, 2021)
दुसरी कसोटी मुंबई (3 ते 7 डिसेंबर, 2021)
हिंदुस्थान-वेस्ट इंडीज मालिकेचे वेळापत्रक
पहिली वन डे अहमदाबाद (6 फेब्रुवारी, 2022)
दुसरी वन डे जयपूर (9 फेब्रुवारी, 2022)
तिसरी वन डे कोलकाता (12 फेब्रुवारी, 2022)
पहिली टी-20 कटक (15 फेब्रुवारी, 2022)
दुसरी टी-20 वायझॅग (18 फेब्रुवारी, 2022)
तिसरी टी-20 त्रिवंद्रम (20 फेब्रुवारी, 2022)
हिंदुस्थान-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी बंगळुरू (25 फेब्रुवारी ते 1 मार्च, 2022)
दुसरी कसोटी मोहाली (5 ते 9 मार्च, 2022)
पहिली टी-20 मोहाली (13 मार्च, 2022)
दुसरी टी-20 धर्मशाला (15 मार्च, 2022)
तिसरी टी-20 लखनौ (18 मार्च, 2022)
हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक
पहिली टी-20 चेन्नई (9 जून, 2022)
दुसरी टी-20 बंगळुरू (12 जून, 2022)
तिसरी टी-20 नागपूर (14 जून, 2022)
चौथी टी-20 राजकोट (17 जून, 2022)
पाचवी टी-20 दिल्ला (19 जून, 2022)





























































