
गणपतीपुळे समुद्रात सांगलीतील चार तरूण बुडाल्याच्या घटनेनंतर पोलीस आणि ग्रामपंचायतीने दुर्घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. गणपतीपुळे समुद्रात दोन धोकादायक ठिकाणांना रेड झोन घोषित करत त्याठिकाणी कुणी पोहायला जाऊ नये, याकरिता रेड फ्लॅग लावण्यात आले आहे. हे दोन डेंजर झोन वगळून अन्य सुरक्षित परिसरात पर्यटकांना पोहण्याचा आनंद घेता येणार आहे.
मागील आठवड्यात गुरूवारी गणपतीपुळ्यात सांगलीहून आलेले चार पर्यटक बुडाले. त्यापैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. याघटनेनंतर पोलीस दल, गणपतीपुळे देवस्थान आणि ग्रामपंचायत विभागाची तातडीची बैठक झाली. या बैठकीत गणपतीपुळे समुद्रात चाळ असलेली दोन ठिकाणं धोकादायक असल्याचे जाहिर करून ती दोन ठिकाणी रेड फ्लॅग लावून या भागात पोहायला जाऊ नका, अशी सूचना पर्यटकांना केली जाणार आहे. ते दोन धोकादायक भाग सोडून अन्य ठिकाणी पर्यटकांना पोहण्याचा आनंद लुटता येणार आहे.
























































