आभाळमाया – ‘अदृश्य’ कृष्णविवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

आपल्याकडचा पावसाळा अधिकृतरीत्या संपायला आणखी महिनाभाराचा अवकाश असल्याने प्रत्यक्ष ‘अवकाशात’ डोकावण्याची संधी एवढय़ात तरी मिळणार नाही आणि पावसाळा ‘संपला’ असे जाहीर झाले तरी निसर्ग कधीही लहरीपणाने वागत असल्याचा अनुभव सारे पृथ्वीवासी घेतायत. कधी नव्हे ते यंदा न्यूयॉर्कच्या भुयारी रेल्वेतही पाणी शिरले! यापुढचे निसर्गचक्र कसे विपरीत असू शकते याची ही एक गोष्ट. मूळ मुद्दा असा की पावसाळा (आणि कोविड) संपेपर्यंत प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर जाऊन आकाशदर्शन करणे कठीणच.

म्हणूनच आपण तोपर्यंत विश्वातील अनेक विस्मयांची थोडक्यात ओळख करून घेत आहोत. गेल्या काही लेखांमध्ये आपण ताऱयांविषयी माहिती घेतली. आपला सूर्यतारा ज्या ‘आकाशगंगा’ दीर्घिकेमध्ये आहे त्यात सुमारे 100 अब्जाहून अधिक तारे आहेत. त्यातला सूर्य हा तर सर्वसाधारण तारा. त्यापेक्षा मोठे (आणि छोटेसुद्धा) अगणित तारे प्रचंड ऊर्जेने अवकाशात आपले स्थान टिकवून असल्याने त्यांचा अस्त तीन प्रकारे होऊ शकतो. आपल्या सूर्याचा आणखी पाच अब्ज वर्षांनी महाकाय रक्तवर्णी तारा होऊन नंतर त्याचे आकुंचन होत त्याचे आधी श्वेत आणि शेवटी कृष्णखुजामध्ये रूपांतर होईल हे आपण जाणले.

ताऱयांच्या या वस्तुमानाचे गणित नोबेल विजेते सी. व्ही. रामन यांचे पुतणे सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांनी 1929 मध्येच मांडले होते. सूर्याचे वस्तुमान ‘एक’ मानले तर त्याच्यापेक्षा 1.4 वस्तुमानाचा तारा न्यूट्रॉन स्टार होईल आणि 3.4 सौर वस्तुमानापेक्षा अधिक असलेल्या ताऱयांचं कृष्णविवरात रूपांतर होते. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांना कालांतराने (म्हणजे बऱयाच उशिरा) नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आणि त्यांच्या या संशोधनाचा सन्मान म्हणून अंतराळात ‘हबल’नंतर गेलेल्या दुर्बिणीला (एक्स-रे) ‘चंद्रा’ दुर्बिण असे नाव देण्यात आले आहे.

यापैकी कृष्णविवराची चर्चा खूप होते. आमच्या आकाश दर्शनाच्या रात्रभराच्या कार्यक्रमात प्रश्नोत्तरे किंवा खगोलीय शंका-समाधानाचा तास-दीड तास असतो. त्यामध्ये ज्यांना सूर्यमालेतील सर्व ग्रहांची नावेही क्रमाने सांगता येणार नाहीत असे काही एकदम ‘कृष्णविवरा’विषयी ऐकीव किंवा कुठेतरी वाचलेल्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे प्रश्न विचारतात. अर्थात त्यांना ताऱयांचा जन्म, जीवनक्रम आणि अंत याची सविस्तर माहिती देऊन, आमचे अभ्यासक त्यांच्या कुतूहलाचे कौतुकच करतात. असे प्रश्न चर्चेत येण्याचे कारण म्हणजे नेटवरची माहिती किंवा मीडियात होणारी चर्चा.

1916 मध्ये अल्बर्ट आइनस्टाईन यांनी गुरुत्वीय लहरींचा सिद्धांत मांडला आणि 2016 मध्ये ‘लायगो’ प्रकल्पाद्वारे त्याचा पुरावा मिळाला. दोन कृष्णविवरांच्या टकरीतून निर्माण झालेल्या एकत्रित ऊर्जेपैकी जी ऊर्जा गणिती प्रारूपात ‘कमी’ वाटत होती ती गुरुत्वीय लहरींमध्ये रूपांतरित झाली आणि असे घडू शकते हे भाकित आइनस्टाईन यांनी शतकापूर्वी केले होते.

… तर गोष्ट कृष्णविवराची. 1905 मध्ये आइनस्टाईन यांनी मांडलेल्या विशेष सापेक्षतावादाच्या सिद्धांताला अप्रत्यक्षपणे त्याचे श्रेय जाते मात्र कृष्णविवर सिद्धांताचे नोबेल रॉजर पेनरोज यांना पुढे चंद्रशेखर यांनी त्याच्या वस्तुमानाचे गणित केले. सूर्याच्या तीन वस्तुमानाइतके तारे न्यूट्रॉन स्टार होऊन स्वतःभोवती प्रचंड वेगाने फिरतात. ते दिसतात. मात्र कृष्णविवराचे वस्तुमान इतके प्रचंड असते की त्याच्या गुरुत्वाकर्षणातून प्रकाशकणही सुटत नाहीत. त्यामुळे कृष्णविवर ‘दिसत’ नाही. कृष्णविवराभोवती एखादा तारा फिरत असेल तर त्याचे द्रव्यही कृष्णविवर खेचून घेते व त्या ताऱयाला गिळते. हे द्रव्य चक्राकार वेगाने त्या कृष्णविवराकडे जाते आणि त्यातून जे घर्षण घडते त्याचा परिणाम म्हणून निर्माण झाले क्ष-किरण ‘त्या’ जागी कृष्णविवर असल्याचे सिद्ध करतात. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रकाचे स्वरूप अशाच महाकाय कृष्णविवराचे आहे आणि आपली सूर्यमाला त्याभोवती वेगाने फिरत आहे. या केंद्राभोवती एक फेरी मारायला सूर्यमालेला 25 कोटी वर्षे लागतात. आतापर्यंतच्या 5 अब्ज वर्षात ‘आपण’ एका कृष्णविवराभोवती वीस वेळा फिरलो आहोत. असे हे कृष्णविवराचे गूढ वाटणारे सत्य!