
बेलापूर गावातील गोशाळेजवळ असणाऱ्या दोन ठिकाणी चोरट्यांनी दरोडा टाकला असून या दरोड्यात रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले आहे. चोरट्यांनी घरातील लग्नाचा अल्बम पाहून त्यातील दागिन्यांची मागणी करीत ही चोरी केली आहे.
बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावरील गोशाळेलगत उदय खंडागळे यांचा बंगला आहे. रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी खंडागळे यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी खंडागळे यांच्या घरातील लहान मुलीच्या गळ्याला चाकू लावला. त्यामुळे घरातील सर्वजण घाबरले. जवळपास दीड तास चोरट्यांनी घरात उचकापाचक केली. त्यांच्या घरातील लग्नाचा अल्बमही चोरट्यांनी पाहिला. त्यातील घरातील महिलांचे फोटो शोधून ‘फोटोत अंगावर घातलेले दागिने लवकर काढून द्या’, असे दरडावले. खंडागळे यांच्या घरातून जवळपास 15 ते 20 तोळे सोने व रोख रक्कमही चोरट्यांनी लांबविली.
भगीरथ चिंतामणी यांच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या घरातून 35 हजार रुपये रोख चोरटय़ांनी लांबविले. भगीरथ चिंतामणी यांचा मुलगा सोमनाथ याने एका चोरटय़ाशी झटापट केली. त्यामुळे चोरटय़ाने त्यांच्या पायावर लोखंडी रॉडने मारहाण केली. सोमनाथनेही त्या चोरटय़ाला चांगलाच चोप दिला. त्याने चोरटय़ाला पकडले असता त्याच्या वडिलांना काय चालले हेच समजले नाही. त्यातून त्यांनी सोमनाथलाच मिठी मारली. त्यामुळे तो चोरटा सोमनाथच्या तावडीतून निसटला.
सोमनाथ याने बेलापूर पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही मिनिटातच बेलापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. सकाळी श्वान पथक बोलविण्यात आले होते. श्वानाने कुऱ्हे वस्तीच्या रस्त्यापर्यंत माग काढला. अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.























































