
राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एका जागेसाठीची निवडणूक भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी माघार घेतल्याने बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. उपाध्याय यांनी आज अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या रजनी पाटील यांची राज्यसभेवर जाण्याची वाट मोकळी झाली आहे.
काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली तर भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीकडे बहूमत असल्याने रजनी पाटील यांची निवड होणार हे निश्चित होते. मात्र कोणताही धोका नको म्हणून काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी पक्षनेते यांच्याकडे विनंती करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांची भेटही घेतली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उपाध्याय यांनी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संजय उपाध्याय यांनी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणूक अर्ज मागे घेतला. यामुळे महाराष्ट्रातून रजनी पाटील या राज्यसभेवर जाणार हे निश्चित झाले आहे.
रजनी पाटील या काँग्रेसच्या माजी खासदार आहेत. त्या सध्या जम्मू–कश्मीरच्या प्रभारी आहेत. राज्यात विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत त्यांचे नाव होतं. पण त्याऐवजी त्यांना राज्यसभेवर संधी दिली आहे. रजनी पाटील या सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जातात.



























































