
‘गुलाब’ चक्रीवादळ शमताच अरबी समुद्रात ‘शाहीन’ चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर राहणारे नागरिक भयभीत झाले आहेत. शाहीनच्या प्रभावाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अतिवृष्टीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गुजरातच्या किनारपट्टीवरील 20 जिह्यांना ‘यलो ऍलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
‘शाहीन’ चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर थेट धडकणार नाही. परंतु त्याच्या प्रभावामुळे मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे विशेषतः किनारपट्टीजवळील जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिह्यांमध्ये सतत पाऊस होत आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आठ जिल्ह्यांमधील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. पूरस्थिती तसेच वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. 200 हून अधिक जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आणि अनेक घरांचेही नुकसान झाले.
‘शाहीन’ हे ‘गुलाब’ चक्रीवादळाचेच नवे स्वरूप
गुलाबचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्टय़ामध्ये झाल्याने दक्षिण गुजरात आणि खंबातच्या आखातावर शाहीनची निर्मिती होत आहे. 30 सप्टेंबरला शाहीन आपला प्रभाव दाखवण्याची शक्यता आहे. 3 ऑक्टोबरपर्यंत त्याचा परिणाम पुढील चार दिवस महाराष्ट्राच्या वातावरणावर राहील असा हवामानतज्ञांचा अंदाज आहे.




























































