मुंबईकरांचे आरोग्य काळवंडण्याची भीती, सी-40 सिटीजचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोळशावर आधारित विद्युत निर्मिती करणाऱया संपूर्ण देशातील प्रकल्पांपैकी नऊ टक्के प्रकल्प मुंबईपासून पाचशे किमी अंतरावर आहेत. या प्रकल्पातील कोळशाच्या अतिसूक्ष्म कणामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. हवेतील या प्रदूषणामुळे चालू शतकात मुंबईत

6 हजार 200 अकाली मृत्यू आणि 3 हजार 200 मुदतपूर्व जन्म होण्याची शक्यता आहे. या प्रदूषणामुळे व्यवस्थेवर ताण वाढण्याची भीती ‘सी 40 सिटीज’च्या नव्या संशोधनात व्यक्त केली आहे.

कोळशावर आधारित विद्युत निर्मिती प्रकल्पातील प्रदूषणामुळे मुंबईकरांना आरोग्य आणि आर्थिक स्तरावर अतिशय घातक परिणामांना सामोरे जावे लागत आहे. जगातील इतर शहरांना अशा प्रकारच्या प्रदूषणामुळे होणाऱया धोक्यांच्या तुलनेत मुंबईला अधिक धोका आहे. देशातील सध्याचे कोळशावरील विद्युत निर्मिती प्रकल्प आणि भविष्यातील त्यांचा विस्तार, नवीन प्रकल्प या अनुषंगाने दक्षिण आणि पश्चिम आशियातील देशातील ‘सी 40 सिटीज’ने केलेले नवीन संशोधन आज प्रसिद्ध झाले आहे.

अकाली मृत्यूचा धोका

कोळशावर आधारित विद्युत निर्मितीतून होणाऱया प्रदूषणामुळे मुंबईत वर्षाला अकाली मृत्यूंचे प्रमाण 35 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, अशी भीती ‘सी 40 सिटीज नॉलेज आणि रिसर्च’ विभागप्रमुख डॉ. रेचेल हक्स्ले यांनी व्यक्त केली.

हरित वायूचे उत्सर्जन

मुंबईला पुरवली जाणारी 95 टक्के वीज ही कोळशावर आधारित स्रोताद्वारे तयार होते. निवासी ग्राहकांकडून वापरल्या जाणाऱया विजेमुळे हरितगृह वायूंचे 55 टक्के उत्सर्जन, तर व्यापारी आणि संस्थात्मक ग्राहकांकडून 45 टक्के आणि औद्योगिक वापरामुळे 4 टक्के उत्सर्जन होते.

राखेचा हवेतून प्रवास

कोळसा जाळून होणाऱया विद्युत निर्मितीदरम्यान होणारे हवा प्रदूषण लांबवरचा प्रवास करतात. त्याचा सर्वांनाच धोका आहे. तरुण, वृद्ध आणि गरोदर महिलांना हा धोका अधिक असतो.

प्रदूषण तीनपट अधिक

‘मुंबईतील हवा प्रदूषण हे जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा तिपटीने अधिक आहे. कोळसाधारित विद्युत निर्मिती प्रकल्पांच्या सध्याच्या राष्ट्रीय योजनांनुसार 2020 ते 2030 मध्ये 20 टक्क्यांनी घट करण्याऐवजी 28 टक्क्यांनी वाढ होईल. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

गरज स्वच्छ ऊर्जेची

राज्य आणि केंद्र सरकारांनी स्वच्छ ऊर्जेमध्ये गुंतवणूक करावी. कोळशावर आधारित विद्युत निर्मिती प्रकल्प लवकरच बंद करावे. नव्याने कोळशाचे विद्युत प्रकल्प उभारू नयेत. मुंबईजवळील असे विद्युत निर्मिती प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करण्याची शिफारस ‘सी 40 सिटीज’च्या संशोधनात केली आहे.