साय-फाय – कपडय़ांची उत्क्रांती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

संशोधकांच्या मतानुसार सुमारे 1 लाख 70 हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये कपडय़ांची उत्पत्ती झाली. कपडय़ांमध्ये आढळणाऱ्या उवांच्या (Clothing Lice) आनुवंशिकतेचा अभ्यास करून संशोधक या निष्कर्षापर्यंत पोहोचले होते या संशोधनाला बळकटी देणारा असा एक नवा शोध नुकताच मोरोक्कोच्या संशोधकांनी लावला आहे. या संशोधकांनी मोरोक्कोच्या गुहेमध्ये 1 लाख 20 हजार वर्षांपूर्वीची अशी काही साधने शोधून काढली आहेत, जी कपडे बनवण्यासाठी आपले पूर्वज वापरत असत. ही साधने हाडापासून बनलेली आहेत.

खरे तर हे संशोधक मोरोक्कोच्या कॉन्ट्रेबॅडियर्स गुहेमध्ये तिथे 90 हजार ते 1 लाख 20 हजार वर्षांपूर्वी वास्तव्य करणाऱ्या आपल्या पूर्वजांविषयी अभ्यास करण्यासाठी गेले होते. त्यावेळचे वातावरण तसेच आपल्या पूर्वजांचा आहार यासंदर्भात त्यांना अधिक जाणून घ्यायचे होते. त्या गुहेत सापडलेल्या हाडांचा अभ्यास करताना त्यांना त्यात काही विशेष आढळले. ही हाडे जेवणानंतर चघळून टाकलेल्या हाडांसारखी दिसत नव्हती, तर विशिष्ट अवजारांनी गुळगुळीत करून त्यांना विविध आकारदेखील देण्यात आले होते. या हाडांचा सखोल अभ्यास केल्यावर संशोधकांच्या लक्षात आले की, त्यांनी एक अभूतपूर्व असा शोध लावलेला आहे. ही हाडाची उपकरणे असून ती आपल्या पूर्वजांकडून त्या काळात कपडे बनवण्याच्या कामासाठी उपयोगात आणली जात होती.

प्राण्यांची कातडी काढणे, त्यापासून फर आणि चामडे मिळवणे यासाठीदेखील यातील काही साधने वापरण्यात येत होती. या हाडांच्या उपकरणांबरोबरच संशोधकांना तिथे रेतीच्या मैदानात आढळणारे कोल्हे, छोटे सोनेरी कोल्हे आणि रानटी मांजराचे अवशेषदेखील सापडले. या हाडांपासून बनवलेल्या साधनांच्या मदतीने या प्राण्यांपासून कातडी तसेच फर गोळा करण्यात आली होती हे स्पष्ट झाले. जंगली जनावरांचे मांस हे खाण्यासाठी, तर कातडी चामडय़ासाठी वापरण्यात येत होती.

या गुहेमध्ये त्या काळातील कपडय़ांचे मात्र कोणतेही अवशेष आढळून आले नाहीत. यावर शास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे की, चामडे, फर किंवा इतर सेंद्रिय अवशेष हे नाशवंत असतात. त्यामुळे असे अवशेष प्राप्त होणे जवळ जवळ अशक्य असते. त्यामुळे त्या काळातील कपडय़ांचे स्वरूप अजूनही अस्पष्ट आहे. मानवाने रहिवासासाठी गुहेचा आसरा घ्यायला सुरुवात केल्यानंतर ही साधने बनवलेली असावीत असे शास्त्रज्ञांचे मत आहे. ही साधने विशेष आकार दिलेली आणि गोलाकार टोकाची आहेत. या प्रकारच्या साधनांना ‘Spatula Tools’ असे संबोधले जाते. प्राण्यांच्या कातडीसाठी आजही काही ठिकाणी अशाच प्रकारची साधने वापरली जातात. कारण ती अत्यंत टिकाऊ असतात व त्यांच्या विशिष्ट आकारामुळे त्वचेला टोचतदेखील नाहीत. गुहेत सापडलेल्या हाडांवर काही व्रणदेखील दिसून आले आहेत. चामडे मिळवण्यासाठी प्राण्यांच्या त्वचेच्या विरुद्ध बाजूला सतत घासल्याने, वापरल्याने ते पडलेले असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.

उत्क्रांतीच्या त्या काळात मानवाने गुहेत राहून ही साधने कशी बनवली असतील? त्यावेळच्या वातावरणाचा त्यावर काही परिणाम होत असेल का? ही साधने बनवण्यासाठी किती काळ लागत असे? या साधनांची देखभाल कशा प्रकारे केली जात असे व त्याला किती वेळ लागत असे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सध्या संशोधक अशाच प्रकारची हाडाची उपकरणे तयार करून त्या काळाशी सुसंगत अशा वातावरणात ती वापरून बघणार आहेत.

आपल्या रोजच्या वापरातल्या कपडय़ांना; जसे की, शर्ट, पँट, जर्किन, मोजे इ. आपण किती सहजतेने बघतो आणि हाताळतो, पण हे कपडे बनवण्याची सुरुवात कधी झाली असेल याचा कधी विचार केला आहे? मानवी उत्क्रांतीमध्ये कपडय़ांचा शोध केव्हा आणि कसा लागला असेल? आपले पूर्वज कपडे शिवण्यासाठी काय साधने वापरत असतील? कपडय़ांसाठी नक्की कशाचा उपयोग केला जात असेल?

[email protected]