
>>अरविंद दोडे
संपूर्ण विश्वात पर्यावरणशास्त्राचा अभ्यास केला जात असून प्रदूषणांविरुद्ध अनेक मोहिमा राबविल्या जात आहेत. त्या समजून घेताना मुळातच पंचमहाभूते कोणती, त्यांचे कार्य काय आणि नैसर्गिक स्रोतांचे रक्षण कसे करावे याची माहिती मिळणे गरजेचे आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांचा समतोल माणसाने बिघडवून टाकला आहे, तो राखण्यासाठी काय काय करता येणे शक्य आहे हे वैश्विक पातळीवर जाणून घेणे विश्वाच्या नागरिकांचे कर्तव्य आहे. या शुद्ध हेतूने पर्यावरणप्रेमी डॉ. रंजन गर्गे यांनी संशोधन करून ‘पंचमहाभूतांचा रुद्रावतार’ या ग्रंथात वैज्ञानिक पातळीवर काही मुद्दे मांडले आहेत.
वेदादी प्राचीन वाङ्मयात पंचमहाभूतांविषयी आपल्या ऋषिमुनींनी अभ्यास केल्याचे वाचायला मिळते. आधुनिक विज्ञानयुगात अधिक संशोधनात्मक विकास झाल्याने शाश्वत तत्त्वे समोर आली आहेत, ती तत्त्वे लेखकाने अधिक विस्तृतपणे वाचकांपुढे मांडली आहेत. प्रथम पृथ्वीचा विचार केला तरी या महाभूतांची व्याप्ती प्रचंड असल्याचे लक्षात येते. हिंदुस्थान हा कृषिप्रधान देश असल्याने तंत्रज्ञानाचा पहिला फटका बसला आहे तो जमिनीला! दिवसेंदिवस सुपीक जमिनीचा कस कमी होताना दिसतो आहे. घन कचऱयाचे व्यवस्थापन करणे बिकट होते आहे. त्यापासून खत निर्मिती, गॅस आणि वीज निर्मिती शक्य आहे. ही आणि अशी जैविक विविधता असून सर्वत्र ऱहास का होतो आहे, याचा ऊहापोह यात शास्त्रीय पद्धतीने केला आहे.
जलदेवता किंवा पाणी हेही एक उपयुक्त महाभूत आहे. त्याचे प्रकार, त्याची उपलब्धता आणि सुरक्षितता सांगून लेखकाने जल व्यवस्थापन, पुनर्भरण आणि सहभागीदारी यांची माहिती दिली आहे. अग्निदेवतेबद्दलही असेच म्हणता येईल. श्रद्धेच्या पलीकडे जाऊन आपण सौर ऊर्जेला स्वीकारल्यास अनेक समस्या सुटू शकतात. अणुऊर्जा आणि सेंद्रिय ऊर्जा यावरील नवसंशोधन नव्या पिढीने करून विकासात्मक कार्यांना वेग येईल यात शंका नाही. ही अत्यंत आवश्यक अशी जनजागृती आहे. हा ज्वलंत विषय हाताळताना सावधानतेचे इशारेसुद्धा दिले आहेत. पर्यावरणाने आपल्याला क्षमा करावी असे एक तरी कारण आपण शिल्लक ठेवले आहे काय? हा प्रश्नही वाचकांस अस्वस्थ करतो.
हवामान आणि तापमान नियंत्रण करणे कठीण झाल्याने ऋतुचक्र बिघडल्याचे दिसत आहे. ‘ग्रीन इकॉनॉमी’, ‘वसुंधरा परिषद’ यांसारख्या सेवाभावी संस्था कार्यरत असल्या तरी दीर्घकालीन कृतिशील आराखडे आखून अवकाश शुद्ध राखणे पृथ्वीसाठी मोलाचे कार्य आहे. प्रत्येकाने आपला सहभाग कसा नोंदवावा आणि ई-मेलद्वारे जनजागृती कशी करावी हेही लेखकाने तळमळीने नमूद केले आहे. थोडक्यात काय, तर हे पुस्तक संबंधित अभ्यासकांसाठी उत्तम पाठय़पुस्तक आहे यात शंका नाही.
पंचमहाभूतांचा रुद्रावतार
लेखक– डॉ. रंजन गर्गे
प्रकाशक– परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे – 2
पृष्ठ– 254, मूल्य– रुपये 350/-




























































