
>>योगेश प्रभुदेसाई
कोल्हापूरची अंबाबाई हे हिंदुस्थानभर प्रसिद्ध पावलेले शक्तिपीठ. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असणारे अंबाबाईचे मंदिर त्रिकूटप्रसाद असून इथे महाकाली, अंबाबाई आणि महासरस्वती अशा तीन देवतांची मंदिरे एकत्र जोडली गेली आहेत. अनेक राजघराण्यांनी शिरोधार्य मानलेली महालक्ष्मी महाराष्ट्राचं प्रमुख शक्तिपीठ. आदिशक्तीच्या नवरात्र उत्सवानिमित्त कोल्लापूरनिवासिनी महालक्ष्मीच्या मंदिराचा परिचय.
कोल्लापुरं महास्थानं यत्र लक्ष्मिर्सदा स्थिता ।। देवीभागवत. लक्ष्मी, महालक्ष्मी, अंबाबाई अशा नावाने ज्ञात असलेली करवीर कोल्हापूरवासिनी दख्खनच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान राखून आहे. उपलब्ध पुराव्यांनुसार आपण असे गृहीत धरू की, साधारण इसवी सनाच्या दहाव्या शतकात महालक्ष्मी देवस्थान अस्तित्वात आले असावे. देवीमाहात्म्याच्या प्राधानिक रहस्यांमध्ये जे महालक्ष्मीचे वर्णन येते जवळपास तशीच मूर्ती कोल्हापूरच्या मंदिरात आहे. मातुलुंगं गदाखेटं पानपात्रं च बिभ्रति ।। या वर्णनाप्रमाणे खालील उजव्या हातापासून सुरुवात करून महाळुंग, गदा, ढाल आणि पानपात्र अशी लांछने आजही मूर्तीमध्ये सुस्पष्ट दिसतात. मूळ नाव कोल्लापूर, जे कालांतराने कोल्हापूर झाले अशा क्षेत्राला करवीर हे नाव कधी रूढ झाले याविषयी संदिग्धता आहे. कोल्हापूरला नुसते करवीरच नाही तर करवीरकाशी असे संबोधन रूढ आहे. दुर्गासप्तशति (देवीमाहात्म्य) ग्रंथात येणाऱया तिच्या ‘सर्वास्याद्या’ म्हणजेच सर्वांची आदिजननी अशा वर्णनामुळे महालक्ष्मीचे महत्त्व वाढीला लागल्याचे दिसते ते इतके की, तिची आदिजननी ही प्रतिमा सर्वसामान्यांतही रुजली होती. देवीमाहात्म्य अंतर्गत प्राधानिक रहस्यामध्ये असा उल्लेख येतो की, सोनेरी वर्ण असलेल्या महालक्ष्मीने सर्वत्र अंधकार आणि शून्यत्व बघून आपल्या तेजाने सर्व विश्व परिपूर्ण केले. त्यामुळे तिला ‘सर्वास्याद्या’ हे नाव प्राप्त झाले. उत्तरेला शिवशंकर काशीचा आत्मा तर दक्षिणेत करवीरकाशीचा आत्मा महालक्ष्मी अशी धारणा होऊन बसली होती. त्यामुळे करवीरकाशीला दक्षिण काशी असेही संबोधन होते. या करवीरकाशीची महती सांगणारा ग्रंथ म्हणजे करवीरमाहात्म्य. स्थलमाहात्म्य सांगणारा ग्रंथ असल्याने तत्कालीन रूढ पद्धतीनुसार ग्रंथावर अनेक पौराणिक कथांचे संस्करण झालेले आढळते. पण यातील कथानकांमधून काही ऐतिहासिक दुवेही गुंफलेले असल्याने हा ग्रंथ महत्त्वाचा ठरतो. इसवी सनाचे तेरावे शतक, सोळावे शतक आणि अठरावे शतक असे या ग्रंथाच्या रचनेचे तीन कालखंड मानले जातात. परंतु अजून रचना कालखंडाची सुनिश्चिती झालेली नाही. फक्त कोल्हापूरच नाही तर महालक्ष्मीचे भक्त दख्खनमध्येही पसरलेले होते हे उपलब्ध पुराव्यांवरून समजते. कदंब, कल्याणीचे (बदामीचे नव्हे!) चालुक्य, दक्षिण कोकण तसेच कोल्हापूरचे शिलाहार, यादव अशा राजघराण्यांनी महालक्ष्मीला शिरोधार्य मानल्याचे आढळते. वास्तवात राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष याचा नवव्या शतकातील संजान ताम्रपट आणि त्यातील महालक्ष्मीचा उल्लेख हा महालक्ष्मीविषयक सर्वात जुना पुरावा मानला जातो, पण त्यामध्ये ती महालक्ष्मी कोणती, कुठली हा उल्लेख नसल्याने तो कोल्हापूर-महालक्ष्मीविषयक सर्वात जुना कोरीव लेख आहे असे थेट म्हणता येत नाही. कोल्हापूरचे शिलाहार तर स्वतःला ‘महालक्ष्मिलब्धवरप्रसाद’ असे बिरुद धारण करून होते. यादव राजा सिंघणदेवाने कोल्हापूरवर आपले राज्य प्रस्थापित केल्यानंतर महालक्ष्मीला अनेक दागिने अर्पण केल्याचा उल्लेख आढळतो.
अद्वितीय स्थापत्य असणाऱया महालक्ष्मी मंदिराचा निर्माता कोण हा अजूनही पुराव्याअभावी न सुटलेला प्रश्न आहे. ‘इसवी सनाच्या पाचव्या शतकात कर्णदेव चालुक्याने बांधायला सुरुवात केली आणि राष्ट्रकुट राजांनी ते पूर्ण केले, महालक्ष्मीचे मंदिर हे सिंद राजांनी बांधले’ या आणि अशा प्रचलित तर्कवितका&ंना छेद देऊन मंदिराचे निरीक्षण करू जाता आपण इतका अंदाज लावू शकतो की, विद्यमान महालक्ष्मी हे दोन वेळा पुनर्बांधणी प्रक्रियेतून गेले. पहिले शिलाहारांच्या कालखंडात; म्हणजेच अकराव्या शतकात, तर दुसरे मराठा कालखंडात; म्हणजेच सतराव्या-अठराव्या शतकात. विद्यमान मंदिर हे तीन मंदिरे एकत्रित जोडलेले म्हणजेच त्रिकूटप्रासाद पद्धतीचे आहे. कदाचित मंदिराला क्षती पोहोचण्याआधीही ते त्रिकूट स्वरूपाचेच आणि एकाच बांधकाम शैलीतले असावे. कारण सद्यःस्थितीला उत्तर भारतीय ‘नागर’ तर दख्खनी ‘वेसर’ पद्धतींचा मिलाफ या त्रिकूटप्रासादामध्ये दिसतो. या फरकावरून देखील मंदिरांची वेगवेगळ्या कालखंडात झालेली बांधणी लक्षात येते. मध्यभागी महालक्ष्मी, उत्तरेकडे महाकाली तर दक्षिणेकडे महासरस्वती अशी मंदिरांची मांडणी विद्यमान महालक्ष्मी मंदिरात आहे. ही तीनही मंदिरे एका सामाईक मंडपाने जोडलेली आहेत. महालक्ष्मी मंदिराचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्याला असणारा वरचा मजला. महालक्ष्मी गर्भगृहाच्या बरोबर वरच्या बाजूला एक गर्भगृह असून आतमध्ये शिवलिंग आणि गणपती आहेत. महालक्ष्मी गर्भगृहाला तसेच वरच्या मजल्यावरील गर्भगृहाला असलेली तीन अंतर्गत दालने हे आणखी या मंदिराचे वैशिष्टय़. या सर्व कारणांमुळे हे मंदिर एकमेवाद्वितीय ठरते. तत्कालीन मंदिरबांधणी तंत्राप्रमाणे महालक्ष्मी आणि महाकाली मंदिरे बाहेरच्या बाजूने श्रुंगारनायिका, सिद्ध, अप्सरा, इत्यादिंच्या शिल्पांनी सुशोभित आहेत.
महालक्ष्मीचा विग्रह मंदिरातून किती वेळा विस्थापित आणि पुन्हा मंदिरात किती वेळा प्रस्थापित झाला याविषयी नोंदी आढळल्या नसल्याने सुमारे चौदाव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंतचा कालखंड हा संदिग्धच आहे. इसवी सन 1715 मध्ये करवीरकर श्रीमंत संभाजीराजेसाहेब यांच्या पुढाकाराने विजयादशमीच्या मुहूर्तावर महालक्ष्मी विग्रहाची पुनर्स्थापना झाली आणि करवीरकाशीला पुनरुज्जीवन मिळाले असं म्हणता येईल. याच कालखंडापासून पुढे कदाचित मंदिराची डागडुजी करण्यात आली असावी. शिवाय मंदिराची विद्यमान शिखरे, चार बाजूंची प्राकारभिंत आणि तीमध्ये असलेली महाद्वार इत्यादी प्रवेशद्वारे करवीर संस्थानाच्या कालखंडातच बांधली गेली. त्यामुळे महालक्ष्मी मंदिर परिसर हा पूर्व आणि उत्तर मध्ययुगीन वास्तुरचनेचा नमुना ठरून जाते. सध्याच्या घडीला घाटी दरवाजा (उत्तर दरवाजा) जवळ असणारे मनिकर्णिका पुंड पुन्हा मोकळे केल्याने मंदिर परिसराला वेगळेच स्वरूप प्राप्त
झाले आहे.
(लेखक भारतीय विद्या अभ्यासक आहेत)
n [email protected]





























































