
येत्या सोमवारपासून शाळांबरोबरच अकरावी आणि बारावीचे वर्गदेखील सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागासह मुंबई महापालिकेनेदेखील परवानगी दिली आहे, पण सध्याच्या परिस्थितीत ज्युनियर कॉलेज कशी सुरू करायची, असा प्रश्न प्राचार्य आणि प्राध्यापकांना पडला आहे. कॉलेजमध्ये शिकणारे असंख्य विद्यार्थी उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. त्यांचे कोरोना लसीकरणच झालेले नसल्याने त्यांना लोकल प्रवासाची परवानगी नाही. त्यामुळे विद्यार्थी कॉलेजमध्ये कसे येणार, असा मोठा प्रश्न प्राचार्यांसमोर उभा राहिला आहे. यासह अन्य काही समस्यांविषयी मुंबईतील ज्युनियर कॉलेज प्राचार्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिले आहे.
शाळा, कॉलेज सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन अध्यादेशात याविषयी अधिक स्पष्टता असावी, अशी मागणीही प्राचार्यांनी केली आहे. कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल प्राचार्यांनी केला आहे. जे विद्यार्थी उपनगरातून मुंबईतील कॉलेजांमध्ये शिक्षणासाठी येणार आहेत त्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
वर्ग, वाचनालय, प्रयोगशाळांची स्वच्छता आणि सॅनिटायझेशन करण्यासाठी बऱयाच कॉलेजमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱयांची कमतरता आहे. यातील बहुसंख्य कर्मचाऱयांनी एकच लस घेतल्याने त्यांना लोकल प्रवासाची परवानगी नाही. याशिवाय काही कर्मचारी निवडणूक डय़ुटीवर असल्याने लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स कशी घेता येणार, असा प्रश्नही कॉलेजांसमोर उभा राहिला आहे. या समस्यांवर शिक्षण विभागाने तातडीने मार्गदर्शन करण्याची मागणी प्राचार्यांतून होत आहे.































































