पोटदुखी झाली म्हणून शस्त्रक्रिया केली, आतून एक किलो नखं आणि लोखंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोटदुखीची तक्रार घेऊन येणाऱ्या एका रुग्णाच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याच्या पोटातून जे बाहेर आलं त्याने डॉक्टरही चक्रावले.

या रुग्णाचं नाव जॉन (बदललेलं नाव) असून तो युरोपमधल्या लिथॉनिया या देशातील क्लायपेडा शहरात राहतो. त्याला गेल्या काही काळापासून पोटदुखीचा त्रास होत होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचा एक्स रे काढण्यात आला तेव्हा डॉक्टर बुचकळ्यात पडले.

कारण, त्याच्या पोटात लोखंडाचे अनेक तुकडे दिसत होते. त्यातले काही जवळपास 10 सेमी लांबीचे होते. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पण, ही शस्रक्रिया सोपी नव्हती.

जवळपास तीन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत त्याच्या पोटातून मानवी नखं आणि लोखंडी वस्तू सापडल्या. त्यात स्क्रू, छोटे नट बोल्ट्स, छोटे पत्रे, धातूच्या सळ्या अशा वस्तू होत्या. त्या खेरीज मानवी नखंही होती.

सुदैवाने डॉक्टरांनी त्या सर्व वस्तू बाहेर काढल्या. आता जॉनची तब्येत स्थिर असून त्याने या वस्तू का गिळल्या याचा शोध घेण्यात येत आहे.