
नगर शहरातून जाणारे जवळपास सर्वच महामार्ग हे राष्ट्रीय महामार्ग म्हणून 2018 मध्येच घोषित झालेले आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून यातील काही रस्त्यांची कामेही प्रस्तावित आहेत. मात्र, बहुतांशी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. हे रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याची दुरुस्तीही करता येत नाही. त्यामुळे ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी महापौर रोहिणी शेंडगे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील नेप्ती उड्डाणपूल ते अमरधाम ते सक्कर चौक रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. या रस्त्यासाठी 30 कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र, अद्यापि या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे. या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याच महामार्गावर सीना नदीवरील पूल अत्यंत धोकादायक झालेला आहे. रस्ता मंजूर करताना यात पुलाच्या कामाचा समावेश नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या कामात सीना नदीवरील पुलाच्या कामाचा समावेश करावा.
नगर-मनमाड महामार्गाचे काम केंद्र सरकारकडून मंजूर झालेले आहे. हा महामार्ग नगर शहरातील सावेडी उपनगर परिसरातून जातो. मध्य शहर व सावेडी उपनगराला जोडणारा हा प्रमुख महामार्ग आहे. या महामार्गाचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत चारपदरी रस्ता मंजूर आहे. मात्र, शहरातील वाढत्या रहदारीचा विचार करता, या रस्त्याचे नागापूर-एमआयडीसी ते पत्रकार चौकापर्यंत ते पोलीस अधीक्षक चौकापर्यंत रुंदीकरण करून नव्याने रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करावा.
नगर शहरात सध्या उड्डाणपुलाचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. हे काम अतिशय वेगाने सुरू आहे. सदरचा महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित आहे. उड्डाणुलाचे काम सुरू असलेला महामार्ग सध्या अतिशय खराब झालेला आहे. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठीही निधी मंजूर व्हावा, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली.
यावेळी नगरसेवक सचिन शिंदे, दत्ता कावरे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी नगरसेवक संजय शेंडगे, ऍड.सतीश गिते आदी उपस्थित होते.





























































