
राज्यातील मंदिरे 7 ऑक्टोबरपासून खुली करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला, मात्र तालुक्यात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता नवरात्रोत्सवात कोटमगाव येथील जगदंबा मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय येथील मंदिर ट्रस्ट व प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणेच या वर्षीही भाविकांनी जगदंबा मातेच्या दर्शनासाठी कोटमगाव येथे येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोटमगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने रविवारी सरपंच सविता कोटमे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेत या ग्रामसभेत नवरात्रोत्सवात या वर्षीही मागील वर्षीप्रमाणे भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा ठराव करण्यात आला.
ग्रामपंचायतीने जगदंबा ट्रस्टला ग्रामसभेच्या ठरावाची प्रत पाठवून मंदिर बंद ठेवण्यासंदर्भात कालच पत्रही दिले. आज सोमवारी तहसील कार्यालयात तहसीलदार प्रमोद हिले यांनी यासंदर्भात सकाळी 11 वाजता बैठक बोलाविली होती. या बैठकीला ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, विश्वस्त भाऊसाहेब आदमाने, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे व स्थानिक पत्रकार हजर होते.
बैठकीत तहसीलदार हिले यांना मंदिर ट्रस्टने पत्र देत मुख्यमंत्र्यांनी मंदिर खुले ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला असून आपण आपल्या स्तरावर मार्गदर्शक सूचना ट्रस्टला द्याव्यात असा सल्ला मागितला होता, मात्र तहसीलदार हिले यांनी ग्रामपंचायतीने मंदिर बंद ठेवण्याचा केलेला ठरावानुसार हाच निर्णय योग्य असल्याचे सांगत आपल्या तालुक्यात आजही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याचे सांगितले.
या वेळी कोटमगावात मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग बॅरिकेटस् लावून नवरात्रोत्सवात बंद ठेवण्याचे निर्देश पत्राद्वारे शहर पोलिसांना देण्याचे आदेश या वेळी नायब तहसीलदारांना दिले. यानंतर शहर पोलीस ठाण्यातही पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांच्या उपस्थितीत ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त, ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीतही मंदिर बंद ठेवणे यावरच सहमती सर्वांनी व्यक्त केली. बैठकीला ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, विश्वस्त भाऊसाहेब आदमाने, शरद लहरे, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे, संतोष परदेशी आदी उपस्थित होते.
तालुक्यात सोमवारी शंभरच्यावर कोरोना रुग्ण
सोमवारी शंभराच्यावर कोरोना रुग्ण असून नवरात्रोत्सवात मंदिर खुले ठेवल्यास भाविकांची गर्दी होऊन रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे. त्यातच कोटमगावची यात्रा ही राज्यभरात प्रसिद्ध असून या ठिकाणी राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर ट्रस्ट व प्रशासनाकडे नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱयांची मोठी कुमक नसल्याने मंदिर बंद ठेवणे हाच पर्याय होऊ शकतो, असे मत तहसीलदार प्रमोद हिले यांनी मांडले.































































