आर्यन खान, अरबाज मर्चंटला खेचत एनसीबी कार्यालयात नेणारे भाजप कार्यकर्ते! नवाब मलिक यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रूझ ड्रग पार्टीतून आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला खेचत एनसीबी कार्यालयात नेणारे एनसीबीचे अधिकारी नव्हते तर ते भाजप कार्यकर्ते होते, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. आर्यन खान याला खेचत एनसीबी कार्यालयात नेणारा के. पी. गोसावी, त्याचप्रमाणे अरबाज मर्चंटला नेणारा मनीष भानुशाली हे दोघेही भाजपशी संबंधित आहेत. एनसीबीला हे सांगावे लागेल की त्यांचे आणि एनसीबीचे काय संबंध आहेत? एनपीडीएस कायदा भाजपच्या हातात आहे काय, असा सवाल नवाब मलिक यांनी आज केला आहे.
एनसीबीच्या क्रूझ ड्रग पार्टीतील कारवाईबाबत नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एनसीबीच्या कारवाईत भाजप कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा पर्दाफाश केला. ते म्हणाले, 3 ऑक्टोबरच्या कारवाईनंतर एनसीबीने स्वतःहून क्राइम रिपोर्टर्सना या कारवाईचे व्हिडीओ दिले होते. त्या व्हिडीओमध्ये हे दोन खासगी लोक अटक करताना स्पष्ट दिसत आहेत. के. पी. गोसावी या व्यक्तीने आर्यन खानची अटक झाल्यानंतर त्याच्यासोबत एक सेल्फी काढला होता. हा सेल्फी बराच व्हायरल झाला. त्यानंतर एनसीबीने ट्विट करून के. पी. गोसावी अधिकारी नसल्याचे सांगितले. के. पी. गोसावीवर पुण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या फेसबुकवर तो खासगी हेर असल्याचे स्टेटस ठेवतो. के. पी. गोसावीचा एनसीबीशी काय संबंध आहे? हे आता समोर आले पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

मोदींसोबत फोटो असलेला
मनीष भानुशाली कोण?
अरबाज मर्चंटला अटक करणारा मनीष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असल्याचे त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. हा व्यक्ती कोण? हे एनसीबीने स्पष्ट करावे, असे नवाब मलिक म्हणाले.

अमली पदार्थांचा फोटो क्रूझवरच का काढला नाही?
z क्रूझवर जे अमली पदार्थ सापडल्याचे सांगितले जात आहेत त्याचे फोटोदेखील एनसीबीच्या मुंबईतील प्रांतिक कार्यालयात काढले गेले आहेत. एनडीपीएस कायद्यानुसार अमली पदार्थ जप्त केल्याच्या ठिकाणीच त्याचा पंचनामा झाला पाहिजे. मग क्रूझवर अमली पदार्थ सापडल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचे फोटो किंवा व्हिडीओ का नाही काढले गेले? असाही प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

भानुशाली गुजरातमधील मंत्र्यांना भेटल्यानंतर मुंबईत एनसीबीची कारवाई
सध्या के. पी. गोसावी आणि भानुशाली यांची फेसबुक प्रोफाईल लॉक आहे. पण भानुशालीची हालचाल आम्ही शोधून काढली असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. भानुशाली हा 21 आणि 22 सप्टेंबर रोजी गुजरातमधील काही मंत्र्यांना भेटला होता. 21 सप्टेंबर रोजीच अदानी पोर्टवर अफगाणिस्तान येथून आलेले हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले होते. त्यानंतर 28 तारखेला पुन्हा एकदा भानुशाली गुजरातमधील मंत्रालयात जाऊन राणा नावाच्या मंत्र्याला भेटला होता. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी मुंबईत कारवाई झाल्यानंतर त्याच कारवाईत भानुशाली कसा काय सामील होता? मनीष भानुशालीचे गुजरातमधील अदानी बंदरावर सापडलेल्या ड्रग्जचा काय संबंध आहे? तसेच भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष कसा? याची उत्तरे एनसीबी आणि भाजपने दिली पाहिजेत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

‘ते’ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचा ‘एनसीबी’चा दावा
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास नकार
कॉर्डेलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणाची चौकशी कायद्याच्या चौकटीत राहून निःपक्षपातीपणे केली जात आहे. के. पी. गोसावी आणि मनीष भानुशाली हे या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते, असे स्पष्ट करत मलिक यांनी केलेले आरोप ‘एनसीबी’चे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी फेटाळले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला.