
नेहमीच आंतरराष्ट्रीय मंचावर तालिबानचे उघडपणे समर्थन करणारा आणि गोडवे गाणारा पाकिस्तानही आता तालिबानवर संतापला आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीने अचानक आणि कोणत्याही सूचनेशिवाय पाकिस्तानसोबतची चमन-स्पिन बोल्डक सीमा बंद केली आहे.
पाकिस्तान आणि तालिबानमध्ये पडू लागल्या वादाच्या ठिणग्या
तालिबानने ही सीमा बंद करून तिथे सिमेंटचे दोन मोठे रोड ब्लॉक उभे केले आहेत. तालिबानच्या या पावलामुळे पाकिस्तान चांगलाच अस्वस्थ झाला आहे. कारण याच मार्गाने पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक वाहनांची ये-जा होत होती. सोबतच पाकिस्तानी नागरिकही व्यवसायासाठी येथून मोठ्या संख्येने ये-जा करत होती. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात सीमा व्यवस्थापनाच्या बाबींवर मतभेद निर्माण झाल्याने तालिबानने हे पाऊल उचलले असावे. पाकिस्तानकडून अफगाणांच्या आवाजावीवर लादलेल्या नवीन आणि ताज्या अटी देखील या वादाचे एक मोठे कारण आहे.
पाकिस्तानने अफगाणिस्तानातून येणाऱ्या प्रत्यक व्यक्तीला व्हिसासोबतच गृहमंत्रालयाकडून एनओसी घेण्याची अटही लादण्यात आली आहे. म्हणजेच पाकिस्तानात येण्यासाठी अफगाण नागिरकांना व्हिसासोबतच पाकिस्तानी गृहमंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र देखील घावे लागणार आहे. एनओसी न मिळाल्यास अफगाण नागरिकांना पाकिस्तानात प्रवेश दिला जाणार नाही आहे.
असं असलं तरी या निर्णयावरून पाकिस्तान सरकारमध्येही अंतर्गत मतभेत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान यांचे सल्लागार शहजाद अरबाब यांनी ट्विट करून म्हटलं होत की, ‘अफगाणिस्तान सीमेवरून येणाऱ्या लोकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात आहेत. हे बंद झाले पाहिजे. वैध व्हिसा धारकांना सहजतेने प्रवेश दिला पाहिजे.’ दरम्यान, पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात भविष्यात सीमा प्रश्नावरून वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




























































