जेन नेक्स्ट – कोरोना संकटाची ‘चंदेरी’किनार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कौस्तुभ सोनाळकर

कोरोना महामारीने जगाला मोठा हादरा दिला आहे यात शंकाच नाही, पण गेल्या अनेक महिन्यांमध्ये या काळ्या ढगाला एक चंदेरी किनार आलेली आहे. फक्त नुकसानीकडे पाहून या ‘चंदेरी किनार’कडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. या तोटय़ामुळे आपण जमिनीवर राहायला शिकू, पण आलेल्या संधी आपल्याला अधिक शहाण्या आणि प्रेमळ भविष्याकडे घेऊन जातील एवढं नक्की!

 नावीन्य म्हणजे बदलाकडे संधी म्हणून पाहण्याची क्षमता आहे, धोका म्हणून नाही असे स्टीव्ह जॉब्स यांनी म्हटले आहे. बदल ही मुळातच एक संधी आहे, असं विधान स्टीव्ह जॉब्स यांनी केलं आहे. किंबहुना, हे विधान त्यांचं असल्याचं मानलं जातं. मग हा बदल तुमच्या दिशेने दसपट जास्त वेगाने येतो आहे अशी कल्पना करून पहा. आपण आज ज्या जगात राहत आहोत, तिथलं हे वास्तव आहे.

कोविडच्या महामारीचे दहा दुष्परिणाम नोंदवा असं मी तुम्हाला सांगितलं तर त्यासाठी तुम्हाला दहा सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही, पण उलथापालथ घडवणारे पाच फायदे सांगा असं म्हटलं तर कदाचित तुमचा गोंधळ उडेल. ठीक आहे, मग मीच सुरुवात करतो. हा बदल आपल्यावर जबरदस्तीने लादला गेलेला आहे हा विचार अस्वस्थ करणारा असला तरी तो थ्रिलिंग आहे आणि आपण जर योग्य दिशेने पावलं टाकली तर आणखी दहा वर्षांनी आपण स्वतःचेच आभार मानू.

गेल्या दोन वर्षांत काय काय घडलं ते पाहू :

  • रिचर्ड ब्रॅन्सन, जेफ बेझोज आणि एलन मस्क यांनी जगाला अवकाश पर्यटनाच्या दिशेने अधिक जवळ नेलं आहे.
  •  झूमने आपलं बाजारमूल्य 400 टक्क्यांहून जास्त वाढवलं आहे.
  •  तज्ञांचे सर्व अंदाज मोडून 2020मध्ये खासगी इक्विटीमधल्या गुंतवणुकीत 62.2 अब्ज डॉलर्सएवढी विक्रमी वाढ झालेली आहे.
  • 2020च्या आर्थिक वर्षात देशातल्या एकूण एमएसएमईचा (मायक्रो, स्मॉल, मीडियम एन्टरप्राईझ) आकडा 63 दशलक्षांहून अधिक आहे.

शैक्षणिक कसब असेल किंवा स्टार्टअप्स असतील, आपल्या संपूर्ण दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झालेला आहे. आज ज्या औद्योगिक कल्पना जन्माला येत आहेत. त्या उद्या निकामी बनणार आहेत. मग आपल्यापुढे कोणता मार्ग आहे? उद्योजकांना यापुढे पंचवीस वर्षांनंतरचे प्रश्न सोडवतील अशा कल्पना आणि प्रक्रियांभोवती आपल्या उद्योगाची बांधणी करावी लागणार आहे. उद्या सकाळी उठल्यावर परिस्थिती कशी असणार आहे हे माहीत नसताना पंचवीस वर्षांनंतरचा भोवताल कसा असेल हे ओळखण्याची अपेक्षा लोकांकडून कशी करता येईल? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे, पण सुदैवाने डाटा सायन्स किंवा माहितीचं शास्त्र आपल्या मदतीला येऊ शकतं. माहितीची गुणवत्ता आणि कस याला डाटा इंजिनीअरिंगने जन्माला घातलेल्या शक्यतांची जोड दिली तर भविष्यातील प्रश्नांची पूर्वकल्पना आपल्याला मिळू शकते. तेही बऱ्यापैकी अचूकतेने. याचा अर्थ उद्योगांना आता भविष्यासाठी अधिक आत्मविश्वासाने योजना आखता येतील आणि या परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस अधिकच सुधारणा होत जाणार आहे.

कॉर्पोरेटमधील कारकीर्दीच्या उंबरठय़ावर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असणारे तरुण उद्योजक आणि कारकीर्द बदलू इच्छिणाऱ्या किंवा आयुष्यातील उद्दिष्टाच्या शोधात असणाऱ्या व्यावसायिकांसाठी आता आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवण्याची हीच वेळ आहे.

पर्यटन, वाहन, हॉटेल किंवा रिटेल यांसारख्या आज कोरोना महामारीमुळे प्रतिकूल परिणाम झालेल्या उद्योगांचा विचार करा. त्यांच्यासाठी ही महामारी अतिशय घातक ठरलेली असली तरी आपण कोण आहोत, आजच्या काळात संपूर्णपणे बदललेल्या ग्राहकाच्या गरजा आपण कशा पूर्ण करणार आहोत याचा विचार करून स्वतःचा नव्याने शोध घेण्याची संधी त्यांच्या समोर आहे. या क्षेत्रांमध्ये नवीन गोष्टी जन्माला येत आहेत, नव्या कल्पना क्रांती घडवत आहेत आणि या उद्योगांचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्टार्टअप्समध्ये दिसणारं टॅलेन्ट अक्षरशः विस्मयचकित करणारं आहे. मी हा लेख लिहीत असताना कदाचित ग्रामीण हिंदुस्थानातल्या कुठल्या तरी घरात एका तात्पुरत्या वर्क स्टेशनवर शेतीमधला पुढचा शोध लागला असण्याची किंवा रिटेल क्षेत्रात इतिहास घडत असण्याची  शक्यता नाकारता येत नाही.

आरोग्य सेवा किंवा पुरवठा साखळी यांसारख्या क्षेत्रांमध्ये देशातलं सर्वोत्तम टॅलेन्ट उभं राहील असा हा काळ आहे. कोरोना महामारीने या क्षेत्रांवर प्रकाशझोत टाकला आहे आणि याच क्षेत्रांमध्ये पुढच्या पिढीतले उद्योजक हिरो जन्माला येणार आहेत. त्यांना अत्यावश्यक सेवक म्हणा किंवा फ्रन्टलाइन वर्कर्स म्हणा किंवा लाईफलाइन्स म्हणा, आपलं आयुष्य आणि पोटपाणी सुरळीत असण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे.

दोन वर्षांपूर्वी मी याचसंदर्भात बोलायला सुरुवात केली होती. आजवर औद्योगिक नेतृत्वामध्ये व्यवहारात्मकता आणि परिवर्तनवाद हे दोन गुण होते. यातला पहिला गुण असलेली व्यक्ती ही अर्थातच अंमलबजावणी करण्यामध्ये अग्रेसर असते. दुसरा गुण असलेल्या व्यक्तीमध्ये दूरदृष्टी असते, ती इतरांना सक्षम बनवते, प्रोत्साहन देते आणि मार्ग दाखवते. आजच्या परिस्थितीत थोडं मागे जाऊन विचार करण्याची, प्रस्थापित व्यवस्था संपूर्ण उलट करण्याची आणि जाणीवपूर्वक धोके पत्करण्याची आवश्यकता आहे. अशा वेळी परिवर्तनवादी नेतृत्वच मार्ग दाखवत आहे. ही वेळ अशी आहे की, जी कामं यंत्र करणार असतील ती यंत्रांकडेच सोपवली जातील आणि औद्योगिक नेतृत्वाला तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी आवश्यक कसब असलेल्या टीम बांधण्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल, तरच त्यांचा उद्योग परिणामकारक ठरू शकेल.

गेल्या दहा वर्षांत झालेला आपला विकास पाहू. परिपूर्ण आणि प्रचंड फायदेशीर डिजिटल परिवर्तन हा त्यातला महत्त्वाचा भाग हे कोणीही मान्य करेल. आकडेवारी असं दर्शवते की, हिंदुस्थानातले ई-कॉमर्स करणाऱ्या लोकांपैकी 75 टक्के लोक केवळ गेली दोन वर्षे इंटरनेटवर आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेला हा अतिशय मोठा बदल म्हणायला हवा. महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण हिंदुस्थानने डिजिटल जग झपाटय़ाने आत्मसात केल्यामुळे हे परिवर्तन म्हणजे एक लोकचळवळ बनली आहे. आपल्या लोकसंख्येचा कोणताही मोठा समूह यापासून दूर राहिलेला नाही. शिक्षण, आरोग्य सेवा आणि कन्सल्टेशन ही क्षेत्रं आता नव्या रिमोट पद्धतीने काम करू लागल्याने कायमसाठी बदलून गेली आहेत. जगात कुठल्याही ठिकाणी राहत असलेल्या विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या टीम आता सवयीच्या झालेल्या आहेत. आता महत्त्वाची ठरते आहे ती गुणवत्ता. कारण स्थळ, वेळेचा अभाव आणि इतर गोष्टी यामुळे पूर्वी उद्योगांमधल्या टॅलेन्टला मर्यादा असत, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. पूर्वीच्या काळी पूर्णवेळ पगारी काम करणाऱ्यांची जागा कॉन्ट्रक्टवर काम करणाऱ्यांनी घेतली आहे आणि ही मंडळी पैसा आणि वेळ वाचवून कंपन्यांना उच्च दर्जाची गुणवत्ता देऊ करत आहेत. घरातून काम करण्याचा आणखी एक इंटरेस्टिंग परिणाम म्हणजे लोकांना आपल्या कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवता येऊ लागला आहे.

हिंदुस्थानसाठी कोरोना महामारीमुळे किती मोठय़ा शक्यता निर्माण झाल्या आहेत याची नुसती कल्पना करून पहा. हिंदुस्थानी तरुणांना हे कसब शिकवण्याच्या संधीविषयी बोलताना देशाच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे, ‘‘स्किल डेव्हलपमेंटला आपण जितकं जास्त महत्त्व देऊ तेवढे आपले तरुण अधिक सक्षम बनतील.’’

कोरोना महामारीनंतरचा हा काळ नव्या कल्पनांचा नव्याने विचार करण्यासाठी अतिशय योग्य आहे. या कल्पनांचा स्रोत सर्वसाधारणपणे तरुणांकडून येत असल्यामुळे त्यांच्यासाठी आपली चमक दाखवण्याची ही उत्तम वेळ आहे. नव्या कल्पनांचा शोध घेण्याच्या वृत्तीला त्या कल्पना परिणामकारकतेने अमलात आणण्याची जोड द्यायची असेल तर त्यावर प्रभुत्व असणं गरजेचं आहे. उत्पादन, तंत्रज्ञान आणि रिटेल या क्षेत्रांमध्ये हिंदुस्थानला भक्कम स्थान मिळवून देण्याची क्षमता आजच्या तरुणांमध्ये आहे, पण त्यासाठी आवश्यक ते कसब आणि सक्षमता त्यांच्यामध्ये येईल हे बघणं सर्वाधिक आवश्यक आहे. सर्वांची एकत्र परीक्षा घेऊन त्यांची पुस्तकी कामगिरी जोखण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. तांत्रिक क्षमतांमध्ये स्पेशलायझेशन करणं आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन, एकाहून अधिक कसब असणं, स्मार्ट असणं, उपायांवर लक्ष केंद्रित करणं, तांत्रिक आणि डिजिटल कामाची माहिती असणं, उद्योजकासारखा विचार करता येणं आणि धोका पत्करण्याची तयारी दाखवणं या महत्त्वाच्या कामांची सर्वसाधारण माहिती असणं ही काळाची गरज आहे.

लेखक वेलस्पून ग्रुपमध्ये समूह संचालक (ह्यूमन कॅपिटल मॅनेजमेंट, जनरल अफेअर्स, सीएसआर आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन) आहेत