HBD AMITABH BACHHAN – अमिताभ बच्चन ऐंशीच्या घरात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>शिरीष कणेकर

अमिताभ बच्चन हा देशातील आजचा व एकूणच सर्वश्रेष्ठ अभिनेता असू शकेल नव्हे आहेच. आजही दिलीपकुमारला कवटाळून बसलेल्या आमच्यासारख्या जुन्या लोकांनाही अमिताभचे श्रेष्ठत्व मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. चित्रपटांमागून चित्रपटांत त्याचं अभिनयाचं नाणं त्यानं खणखणीत वाजवून दाखवलंय. चित्रपट ‘शोले’सारखा तुफान चालो नाही तर ‘एक नजर’सारखा फ्लॉप ठरो, अमिताभ कायम दशांगुळेवरच राहिलाय. ‘अमिताभनं काय टुकार काम केलंय’ अशी निर्भत्सना कदापि त्याच्या वाटय़ाला आली नाही. त्यानं येऊ दिली नाही.

अगदी सुरुवातीपासून दोन गोष्टी त्याच्या विरोधात होत्या. सामान्य रूप व उंटासारखी ताडमाड उंची. पण अभिनयाच्या बळावर कशावरही मात करता येते हे त्याने सप्रमाण सिद्ध केले. वास्तविक त्याचा देह नाचण्यासाठी घडला नव्हता, पण तो नुसताच नाचला नाही तर प्रेक्षकांनाही आपल्या तालावर नाचायला लावले. आपण रूपवान नाही हे तर त्यानं प्रेक्षकांना पार विसरायला लावलं. तो अभिनय करायला आला होता, आपल्या रंगरूपाचं प्रदर्शन मांडायला नव्हे.

मुख्य म्हणजे तो कोणाची नक्कल करून जागा बळकावू पाहत नव्हता. तो त्याचं काम करीत होता व प्रेक्षकांना बेहद्द आवडत होतं. आणखी काय पाहिजे?

वय वाढत गेलं तशी (इतर नायकांप्रमाणे) त्याच्या भूमिका कमी होत गेल्या नाहीत. उलट वाढल्या. त्याची अभिनयक्षमता ही वादातीत गोष्ट झाल्यानंतर त्याला वयस्क भूमिका मिळू लागल्या. गंमत म्हणजे त्याच्यासाठी खास भूमिका लिहिल्या जायला लागल्या. तो आजही मध्यवर्ती भूमिकेतच असतो. त्याच्या भोवतीच सिनेमा फिरतो. रूढअर्थाने नसेल, पण ऐंशीच्या घरातील तो नायकच आहे. त्याच्या मुलाची हिरोगिरी भले संपली असेल, पण अमिताभ इज स्टिल अभिताभ. त्याला भूमिकांचा तुटवडा नाही. तो काही पिढय़ांचा नायक आहे. चित्रपटांतील, कथानकातील, सादरीकरणातील सर्व बदल त्यानं लीलया आत्मसात केले. त्याच्या टिकावूपणाला तोड नाही.

त्याचा व्यवस्थितपणा हिंदी चित्रपटातील हीरोनं कधी पाहिला वा कल्पिला नसेल. अपॉइंटमेंटच्या ठोक्याला तुम्हाला आत घेतलं जातं, बंगल्यामागच्या हिरवळीवरील शाकारलेल्या टुमदार झोपडीत तुम्हाला नेलं जातं. तिथं तुमचं स्वागत करायला स्वतः बच्चनसाहेब शाल पांघरून उभे असतात. तुम्हाला बसायला सांगितल्यावर मगच ते स्थानापन्न होतात.

‘आप चाय लेंगे या कॉफी?’ तो त्याच्या खर्जातल्या आवाजात विचारतो.

आपण काहीतरी उत्तर देतो. तो उगीचच नर्व्हसली हसतो.

आपल्याला कळत नाही की नर्व्हस त्यानं व्हायचं की आपण? चहा येतो. मुलाखत होते. अमिताभ उभं राहून नमस्कार करून आपली बोळवण करतो. इतकंच नाही तर बंगल्याच्या फाटकापर्यंत तो सोडायला येतो. इथे आपल्या भिन्न भूमिका स्पष्ट होतात. तो अमिताभ बच्चन असतो; आपण आपण असतो. अमिताभशी आपली आता चांगली ओळख झालीय हा भ्रम पुढल्या भेटीत संपतो. पहिल्या भेटीची तशी न् तशी पुनरावृत्ती दुसऱया भेटीत होते. नमस्कार, तो स्वागत करतो. त्याच्या चेहऱयावर पुसटही ओळख नसते. आपल्या चेहऱयावरची ओळख पुसली जाते.
‘तुमच्यावर कोणाचाच प्रभाव नाही का?’ मुलाखती दरम्यान मी त्याला विचारले होते.

‘आहे नं!’ तो सहजगत्या म्हणाला, ‘आधीच्या पिढीतील कोणाकोणापासून काय काय घेण्यासारखं होतं. चंद्रमोहन, मोतीलाल, अशोककुमार, दिलीपकुमार… दिलीपकुमारपासून मी काहीच घेतलं नाही असं जर माझ्या पिढीतील कोणी म्हणत असेल तर मी एवढंच म्हणेन की तो खोटं बोलतोय. त्याची तन्मयता घेण्यासारखी आहे. त्याचा कुठलाही सीन बघताना मनात येतं की याहून चांगला करता येणार नाही.’

‘शक्ती’मध्ये हे दोन दिग्गज समोरासमोर उभे ठाकले होते. अभिनयाची ही जुगलबंदी प्रेक्षणीय ठरणार याची सगळय़ांनाच खात्री होती आणि तसंच झालं. त्या सुमारास मी शम्मी कपूरला भेटलो होतो. सहाजिकच ‘शक्ती’चा विषय निघाला. शम्मी म्हणाला, ‘आम्ही तोडीस तोड द्वंद्वाची वाट बघत होतो. बट व्हेअर वॉज अमिताभ? देअर वॉज ओन्ली दिलीपकुमार…’

शम्मी आपल्या पिढीशी इमान राखत होता. मला त्याचं म्हणणं मुळीच पटलं नाही. अमिताभनं तोडीस तोड काम केलं होतं. तो तसूभरही कमी पडला नव्हता. तुम्हाला काय एकाचाच अभिनय दिसतो?

अमिताभनं अभिनय इतक्या उंचीवर नेऊन ठेवलाय की तो नजीकच्या काळात ओलांडला जाईल असं वाटत तरी नाही. एकूणच चित्रपटातील अभिनयाचा स्तर उंचावलाय. अमिताभसारख्यानं तो गगनाला भिडवलाय. तब्येतीच्या तक्रारींवर मात करीत या वयात तो दमदार पावलं टाकत अभिनय क्षेत्र पादाक्रांत करीत आहे.

आज त्याचा 79वा वाढदिवस. लक्ष लक्ष शुभेच्छा!
n [email protected]