
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पाण्याचा साठा रविवारी रात्री 110 टक्के झाला असून, धरणात मोठय़ा प्रमाणात आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले असून, भीमा नदीत 30 हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. रविवारी दौंड, बंडगार्डन, घोड धरणातून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने एका दिवसात जवळपास दोन टक्क्याने पाण्याची पातळी वाढली आहे.
दौंड येथून 14 हजार 750, बंडगार्डन 8 हजार 721 व घोड उपखोरे धरणातून 7 हजार 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणातून 30 हजार, नीरा नदीतून 5 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने भीमेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
उजनी धरणाचे 16 दरवाजे 0.44 मीटरने उघडण्यात आले असून, सीना-माढा, दहीगाव बोगद्यात व मुख्य कालव्यातही पाणी सोडण्यात आले आहे. उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग सुरू असल्याने पाणीपातळी वाढत चालली असून, प्रशासनाकडून भीमाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनीतील पाण्याची सद्यःस्थिती
एकूण पाणीपातळी – 497.260 मीटर
एकूण पाणीसाठा – 122.42 टीएमसी
उपयुक्त साठा – 58.76 टीएमसी
टक्केवारी – 109.68 टक्के
धरणात येणारी आवक
दौंड – 14,750 क्युसेक
बंडगार्डन – 8721 क्युसेक
धरणातून होणारा विसर्ग
भीमा नदी – 30,000 क्युसेक
कालवा – 700 क्युसेक
बोगदा – 200 क्युसेक
वीज निर्मिती – बंद























































