मराठीचा पुळका दाखवणाऱया भाजपचे 82 पैकी 44 नगरसेवक अमराठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिटणीस खात्याच्या सेवाज्येष्ठता निश्चित करण्याच्या प्रस्तावाबाबत भाजपने केलेल्या आरोपांचा शिवसेनेने चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेनेने स्थापनेपासूनच मराठी माणसाच्या हितासाठी लढा दिला आहे. त्यामुळे मुंबईत 82 पैकी तब्बल 44 म्हणजेच 50 टक्क्यांहून जास्त ‘अमराठी’ नगरसेवक असलेल्या भाजपने चिटणीस पदाच्या नियुक्तीवरून खालच्या पातळीचे राजकारण करू नये, असा सणसणीत टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी लगावला आहे.

सद्यस्थितीत प्रभारी पालिका चिटणीसपदी जून 2020 मध्ये संगीता शर्मा यांची नियुक्ती झाल्यापासून भाजपने या पदासाठी मराठी असलेल्या शुभांगी सावंत यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. मात्र भाजपचे आरोप निराधार आणि मराठीचे बेगडी प्रेम आहे. प्रभारी चिटणीसपदी पदी झालेली नियुक्ती नियमानुसारच असून ‘मराठी – अमराठी’ असा कोणताही भेदभाव नसल्याचे यशवंत जाधव म्हणाले.

प्रत्यक्ष बैठकांचा निर्णय सरकारच्या आदेशानंतरच

z मुंबईत कोरोना पूर्ण नियंत्रणात आला असला तरी धोका अजून पूर्ण टळलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाच्या निर्देशानुसार अजूनही पालिकेच्या वैधानिक समित्यांच्या बैठका ऑनलाइन होत आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालनही करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर तातडीने सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत बैठक घेतली जाईल, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

मुंबईत कोरोना नियंत्रणात असल्याने पालिकेच्या सभा सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत घ्याव्यात अशी मागणी खुद्द शिवसेनेकडूनही करण्यात येत असल्याचे यशवंत जाधव म्हणाले. याबाबत कार्यवाही करण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत. असे असताना भाजपच्या नगरसेवकांना दुसरे काम नसल्याने केवळ राजकारण करण्यासाठी ‘आंदोलना’चा उद्योग सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, सदस्यांना बैठकीला बसण्याची परवानगी देण्यात आली नसल्याने भाजपने पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

n भाजपचे आरोप निराधार आणि मराठीचे बेगडी प्रेम आहे. प्रभारी चिटणीस पदी झालेली नियुक्ती नियमानुसारच असून ‘मराठी – अमराठी’ असा कोणताही भेदभाव नसल्याचे यशवंत जाधव म्हणाले.