शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी दलित तरुणाचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळल्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत असलेल्या सिंघू बॉर्डरवर शुक्रवारी पहाटे एका दलि तरुणाचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. लखबीर सिंग असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्या हात पाय तोडलेला मृतदेह पोलिसांच्या बॅऱिकेट्सला बांधून ठेवला होता.

लखबीर सिंग हा पंजाबमधील तरण तरण जिल्ह्यातील चीमा खुर्द गावातील होता. त्याच्या पश्चात त्याची पत्नी व तीन मुलं आहेत. लखबीर सिंग वेठबिगारीचे काम करून त्याच्या कुटुंबाटा सांभाळ करत होता. शुक्रवारी त्याचा मृतदेह शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी सापडल्याने खळबळ उडाली.

या प्रकरणी संयुक्त किसान मोर्चाने निहांग सिखांवर गंभीर आरोप केला आहे. सदर तरुण गेल्या काही दिवसांपासून निहंगांच्या ग्रुपसोबत राहत होता असे देखील संय़ुक्त किसान मोर्चाने सांगितले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. ‘अद्याप ही हत्या कुणी केली याची माहिती मिळालेली नाही. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून त्या व्हिडीओवरून तपास करत आहोत’, असे पोलिसांनी सांगितले.