
>> शशिकांत सावंत
पुस्तकांच्या वाटा ज्यांना खुणावतात त्यांच्यासाठी विराट चांडोक हे नाव नवं नाही. पुस्तकांच्या जगात रमणाऱ्या आणि रमायला लावणाऱ्या या अवलियाविषयी.
1990-91च्या सुमारची गोष्ट आहे. मलबार हिलवर राहणाऱ्या घरचा उत्तम व्यवसाय असणाऱ्या श्रीमंत घरातील एका मुलाला घरचा व्यवसाय सोडून आणि इतर काही गोष्टी सोडून चक्क पुस्तक विकण्याची बुद्धी झाली. अर्थात काही लोकांनी त्याला वेड्यात काढले, पण पुस्तकाच्या क्षेत्रात दादा म्हणून हे नाव फार मोठं मानलं जातं. इतका की मुंबईतल्या जवळपास पाच मोठ्या दुकानांचा तो प्रमुख होता. लोटस हे 1990च्या दशकात सुरू झालेले दुकान. अर्थात त्या काळात इंटरनेट वगैरे नव्हतं. त्यामुळे वर्ल्ड बुक या विश्वकोशाची मोठ्या प्रमाणावर विद्यालयीन स्तरावर विक्री जोरदार होत असे. इतकी की त्या काळात अनेकांनी नोकऱ्या सोडून हा उद्योग सुरू केला. वर्ल्ड बुक/लोटस नावाचं दुकान होतं… विराट चांडोकची नेमणूक तेथे झाली. त्या काळात या दुकानात जायला मी घाबरायचो कारण प्रत्येक पुस्तकाची किंमत ही पाचशे-हजारच्या आसपास असायची आणि तिथे महेश भटसारखा दिग्दर्शक शांतपणे वाचत बसलेला असायचा. मुंबईतील नामवंत लेखक, कवी, चित्रकार, कलावंत इथे यायचे. अरुण कोलटकरसारख्या कवीने जेव्हा अमित चौधरीसारखा दुसरा कवी भेटला तेव्हा त्याला म्हटलं की, ‘लोटस इज द रियल बुक शॉप.’ ते खरंच होतं.
स्ट्रॅन्ड आणि न्यू अँड सेकंड हॅन्ड भरभराटीला आलेली अनेक दुकानं होती. पण लोटसचं मोठं वैशिष्टय़ होतं ते म्हणजे अनवट पुस्तकं. जगाच्या पाठीवरील कुठलेही पुस्तक ते तुम्हाला शोधून आणून द्यायचे. त्या पुस्तकावर एकही पैसा डिस्काउंट नसायचा. त्यामुळे ते अधिकच महाग वाटायचे. याचं कारण असं होतं की, विराट चांडोकने प्रकाशकांकडून पुस्तक घ्यायला सुरुवात केली होती आणि त्यात अनेकदा त्यांनाही डिस्काउंट मिळत नसे.
एक उदाहरण सांगतो… सिने क्षेत्रातील मित्राने पोएटिक ऑफ डोस्टो वस्क नावाचं पुस्तक विकत मागितलं. हे बाखतीन नावाच्या समीक्षकांचं पुस्तक होतं. माझ्या माहितीतल्या कोणी हे पुस्तक पाहिलेलं नाही. मी त्याची किंमत विचारली तेव्हा ती अठराशे रुपये होती. अर्थात मित्र नाही म्हणाला. कारण 1994-95च्या सुमारास अठराशे ही फार मोठी रक्कम होती. काही वर्षे चालल्यानंतर लोटस बंद पडलं आणि काही काळ क्रॉसवर्डच्या आणि शॉपर्स स्टॉपच्या दुकानात विराटने काम सुरू केलं. तिथेही त्याने उत्तमोत्तम पुस्तके आणली आणि लावली. विराटचं पुस्तकांबद्दलचं ज्ञान विलक्षण आहे. कथा, कादंबरी, कविता, फिक्शन, नॉन फिक्शन या सर्व क्षेत्रातील मोठे लेखक व चांगले पुस्तक त्याला माहीत आहे. कधी मध्ये तो बोलतो फार गप्पा मारत नाही. तो रोज स्वतः एक पुस्तक विकत घेतो. माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं की, विराटचा स्वतःचा पाच हजार पुस्तकांचा संग्रह होता आणि काही कारणाने त्याला जागा खाली करावी लागली. म्हणून तो त्याने पूर्ण ग्रंथसंग्रह स्वस्तच विकून टाकला. विराट स्वतःही एक पुस्तक संग्राहक आहे. त्यामुळेच त्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील पुस्तक संग्राहकांशी मैत्री करणे सोपे जाते.
धनंजय चंद्रचूडसारखा देशभरातील कीर्तिवंत वकील न्यायाधीश त्याचा ग्राहक आहे. हे असे अनेक ग्राहक नंतर त्याचे मित्र होतात. माझा मित्र राजू श्रीखंडे असतील किंवा गोव्याचे संग्राहक आयएएस अधिकारी, दौलत हवलदार असतील हे मोठे संग्राहक आहेत. कित्येक हजार पुस्तक बाळगून असलेले आणि हे सारे विराटचे मित्र आहेत. शॉपर्स स्टॉपनंतर त्याने लँडमार्क या नवीन दुकानाची सुरुवात केली. सपाट जागेवर उभारलेल्या या पुस्तकाची संख्याही अर्थात खूपच होती. परळ ते इनॉर्बिट अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची प्रशस्त दुकानं होती. मात्र हळूहळू पुस्तकांचा संकोच होऊ लागला आणि एक दिवस लँडमार्कनेही पुस्तकांची काही दुकानं बंद केली.
आता विराट काय करतो? याच्याकडे अनेक मित्रांचं लक्ष होतं. सुदैवाने त्याच्या एका इन्वेस्टर बँकर मित्राने एक अत्यंत महागडी जागा अपोलो बंदरवर घेऊन दिली आणि वेवार्ड अँड वाईज पुस्तकाचं दुकान सुरू झालं. जिथे दहा-एक हजार पुस्तकांचा संग्रह होता. या सगळ्या पुस्तकांची रचना ही वेगळी होती. लोटसमध्ये दर्शनीच महत्त्वाची पुस्तकं काढून ठेवलेली असत आणि रॅकच्या रॅक असत.
एकदा मी आणि दौलत हवालदार अंधेरीचा इनॉर्बिटमध्ये गेलो. हवालदारांना स्वतः बुक ऑन बुक्स, म्हणजे पुस्तकांबद्दलची पुस्तकं जमवण्याचा छंद आहे. त्यामुळे विराट दरवेळी भेटला की त्यांना काढून देतो. पण शेक्सपिअरवरचं एक पुस्तक मला आवडलं तर विराट हवालदारांना म्हणाला, ‘हे एक उत्तम पुस्तक आहे, तुम्ही घ्या. हवालदारांनी ते पुस्तक मला भेट म्हणून दिलं. मी घरी आणून ते पुस्तक वाचलं. शेक्सपिअरचं चरित्र वेगवेगळ्या ठिकाणी तेच आलेलं आहे. यात नवीन काय असणार पण त्यात शेक्सपियरने वाचलेल्या पुस्तकांवर एक चाप्टर होता. ही आहे विराटची कमाल. जो मला इतर चरित्रांत सापडला नाही. माझ्या संग्रहातील कितीतरी पुस्तके मी विराटकडून घेतलेली आहेत.
दरवर्षी अनवट पुस्तपं विराट आपल्याला नेहमीच मिळवून देतो. मिशेल वेलबेक्ससारखा फ्रेंच लेखक मला त्याच्याकडेच मिळाला. डोनाल्ड बारथलेमसारखा लेखक याची चर्चा विराटच करू शकतो. तो म्हणाला, त्याच्या कथा लहान असतात. त्या खूप छान आणि अर्थपूर्ण असतात. त्या वाचायला खूप सोप्या वाटतात. पण त्याच्यात खूप काही कठीण असते. कविता ही विराटची खूप आवडती गोष्ट आहे. अनेक वर्षांपूर्वी त्याने जेंटलमनच्या कविता विशेष अंकात फार सुंदर लेख लिहिला होता. मी तो जपून ठेवलाय.
वेवर्ड अँड वाइजमध्ये अनेक पुस्तपं जमवली. त्यात महत्त्वाचे सगळे लेखक होते. पण एक महत्त्वाची मालिका म्हणजे अमेरिकन लायब्ररीची बहुतेक पुस्तके त्यांनी ठेवली. ती पुस्तकं ऑसिड फ्री पेपरवर छापलेली असतात. त्यामुळे 100 वर्षांनंतरही ती पिवळी पडत नाहीत. त्याचं बायडिंग विलक्षण असतं. अर्थातच त्याच्या किमतीही खूपच असतात. दोन-सवादोन हजार, चारच्या पुढे त्यांच्या किमती आहेत.
तर अशा विराट चांडोकने आता रिलायन्सच्या व्हाईट क्रो दुकानाचा क्युरेटर म्हणून काम सुरू केलं आहे. क्युरेटर हा शब्द निरंजन राज्याध्यक्ष यांनी त्याच्यासाठी वापरला. चित्रप्रदर्शनात चित्र आयोजित करणारी माणसं तज्ञ असावी लागतात. त्यांना क्युरेटर म्हणतात. विराट हा साधा पुस्तक सेल्समन नाही तो पुस्तकांचा तज्ञ आहे आणि म्हणूनच त्याला क्युरेटर म्हणणं योग्य आहे. रिलायन्सने त्याला आपल्या, वांद्रय़ाच्या जिओ वर्ल्डमध्ये प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली आहे. सगळेच मित्र कधी तिथे जायला मिळत आहे याचा मुहूर्त ठरवत आहेत. देश-विदेशातील दर्जेदार कॉफीचा आस्वाद घेत तिथे खुर्च्यांवर बसून पुस्तपं चाळता येतात. अगदी बसून लिहायचीदेखील इथे सोय आहे. विराट पुन्हा पुस्तकांमध्ये येऊन उभा आहे. हे चित्र डोळ्याला फारच आकर्षक आणि विलोभनीय वाटते.




























































