
महिला गटात राधिका कानिटकर व प्रियांका मेहता आणि पुरुषांत अमनदीप सिंग कोहली व वर्धन शहा या जोडय़ांनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून एमएसएलटीए आयटीएफ वरिष्ठ एस 100 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतील दुहेरीत विजेतेपद संपादन केले.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटने (एमएसएलटीए) तर्फे आयोजित व आयटीएफ आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली डॉ. जी. ए. रानडे टेनिस सेंटर, मुंबई येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत दुहेरीत 35 वर्षांवरील पुरुष गटात अमनदीप सिंग कोहली व वर्धन शहा या जोडीने आकाश काळे व विमल रॉय यांचा 6-1, 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले, तर याच महिला गटात राऊंड रॉबिन फेरीत राधिका कानिटकर व प्रियांका मेहता या जोडीने 2 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद पटकावले. दुहेरी 45 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत नितीन कीर्तनेने निखिल रावच्या साथीत सुधीर गोथे व दशरथ साळवी यांचा 6-0, 6-2 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. दुहेरीत 55 वर्षांवरील गटात राऊंड रॉबिन फेरीत हिमांशू गोसावी व भूषण आकुत या जोडीने 2 गुणांसह विजेतेपद पटकावले. 65 वर्षांवरील गटात राऊंड रॉबिन फेरीत विनायक गुजराथी व मुर्थती सुरेश यांनी 2 गुणांसह विजेतेपदाचा मान पटकावला. एकेरीत उपांत्य फेरीत 35 वर्षांवरील पुरुष एकेरी गटात बिगरमानांकित आनंद कोठारीने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत तिसऱया मानांकित दत्ता रेवांतचा 7-5, 3-6, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला.

































































