
मोहटादेवीच्या पालखी सोहळ्याच्या वेळी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांना धक्काबुकी करण्यात आली. याप्रकरणी दहा ते पंधराजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक केली आहे.
महादेव आसाराम दहिफळे व विठ्ठल आसाराम दहिफळे यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, महादेव दहिफळे याला अटक केली आहे.
शारदीय नवरात्रोत्सव संपल्यानंतर शनिवारी मोहटादेवीची मोहटे गाव ते देवीगड अशी मिरवणूक काढण्यात आली होती. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, प्रवीण पाटील हे गडाच्या पायथ्याला बंदोबस्तावर असताना शंभराहून अधिक लोक बँडच्या तालावर नाचत येत असल्याचे दिसून आले. यावेळी ‘जमावबंदी आदेश लागू असल्याने मोठय़ा संख्येने थांबलेल्या लोकांनी निघून जावे, असे आवाहन चव्हाण यांनी स्पीकरवरून केले. यावेळी महादेव व विठ्ठल यांनी चव्हाण यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी महादेव याला पकडून ठेवले. मात्र, दहा ते पंधराजणांनी विठ्ठलला पळून जाण्यास मदत केली.



























































