
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे खंडणीप्रकरणी आणखी एकाला क्राइम ब्रँच युनिट 11ने गुजरात येथून अटक केली. अल्पेश पटेल असे त्याचे नाव असून तो हवाला ऑपरेटर आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक गुजरातच्या मैसाना येथे गेले होते. खंडणी प्रकरणात ही दुसरी अटक आहे.
बांधकाम व्यावसायिक विमल अग्रवाल याने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे, अल्पेश पटेल, सुमित सिंग ऊर्फ चिंटू, विनय सिंग आणि रियाज भाटी विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बारा लाख रुपये आणि दोन महागडे मोबाईल घेतल्याचा आरोप अग्रवाल याने केला होता. अग्रवाल याच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी परमबीर सिंह यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा नोंद केला होता. या गुह्याचा तपास क्राइम ब्रँच युनिट 11कडे देण्यात आला. कागदोपत्री पूर्तता झाल्यावर युनिट 11ने तपास हाती घेऊन सुमित सिंगला अटक केली होती. या गुह्यात अल्पेशचा सहभाग आढळून आला होता. तो गुजरातच्या मैसाना येथे लपून बसल्याची माहिती युनिट 11ला मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक मैसाना येथे गेले. तेथून अल्पेशला अटक करून मुंबईत आणले. अल्पेशला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.



























































