
कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार (46) यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. कर्नाटकमधील लाडका सुपरस्टार आज आपल्यात नाही. त्यांच्या जाण्याने कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याची भावना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे.
शुक्रवारी सकाळी जिममध्ये वर्कआऊट करताना पुनीत यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यानंतर बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पुनीत यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शेकडो चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर, रस्त्यांवर गर्दी केली होती. चाहत्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक भागांमध्ये कलम 144 लागू केले होते. येथील सर्व थिएटर्स बंद ठेवली होती.दरम्यान, पुनीत यांचे पार्थिव शनिवारी अंत्यदर्शनासाठी कांतिरावा स्टेडियममध्ये ठेवण्यात येणार असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.
पुनीत हे कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचे धाकटे चिरंजीव. ‘बेट्टड हुवू’ मधील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘अप्पू’, ‘चालिसुवा मोडागलू’, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरासु’, ‘युवारत्न’ असे अनेक हिट चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे 14 चित्रपट शंभरहून अधिक दिवस थिएटरमध्ये झळकले होते.

























































