मनतरंग – मानसिक आधाराची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिव्या नेरुरकर-सौदागर

अध्ययन अक्षमता असेल तर मूल हे बऱ्याचशा मानसिक त्रासातून जात असते. ‘मला अभ्यास कळत नाही म्हणून मी करत नाही’ हेही मूल आपल्या पालकांना पटवून देऊ शकत नाही कारण कोणीही विश्वास ठेवणार नाही हा नैराश्यपूर्ण विचार त्यांच्या मनात असतो. त्यांचे पालकही मग ‘आपण कुठे कमी पडलोय का?’ या विचाराने अधिकाधिक केविलवाणे प्रयत्न करत राहतात. हे सगळं टाळायचं असेल तर सर्वप्रथम ‘अध्ययन अक्षमतेबद्दलचे गैरसमज मनातून काढून टाकले पाहिजेत.

आई – मुलाच्या हळव्या नात्याप्रमाणेच असलेलं बाबा-मुलाचं नातं. हल्लीच्या काळात हे नातंही बरंच तरल होत गेलेलं बऱ्याचशा कुटुंबांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मला नेहमीच वाटतं की ही ‘विभक्त कुटुंब पद्धती’ची कृपा आहे. कारण, जेव्हापासून ही कुटुंब पद्धती अनेक घरांत दिसू लागली तेव्हापासून ‘बाबा’ हा अधिकाधिक मुलांजवळ यायला लागला. मुलांना काय हवं नको ते पाहायला लागला. आपल्या मुलांना जमेल तसा वेळ द्यायला लागला. त्यांच्या भावविश्वात रमू लागला. ‘आपलं मुल सुरक्षित आहे ना’ याची (आईपेक्षा थोडीफार जास्तच) खातरजमाही करायला लागला.

असाच एक बाबा किशोर (नाव बदलले आहे) काही महिन्यांपासून समुपदेशनासाठी आपल्या मुलाबरोबर येत होता. ‘माझा मुलगा योहान (नाव बदलले आहे) हा अभ्यासात दुर्लक्ष करतो, आळशी आहे, बेशिस्त आहे’ या अशा स्वरूपाच्या तक्रारी त्याच्या दहा वर्षांच्या मुलाबद्दल होत्या.

किशोर हे एका नामांकित शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे साहजिकच शिक्षणाबद्दल त्यांना बरीच आस्था होती. त्यांचे अनेक विद्यार्थी हे चांगल्या गुणांनी पास होऊन वेगवेगळ्या क्षेत्रांत नाव कमवत होते. आपल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच आपला मुलगाही शिक्षणात पुढे असावा ही त्यांची माफक अपेक्षा होती. किशोर सरांचे दुसरे वैशिष्ट्य हे की ते एक ‘आदर्श शिक्षक आणि आदर्श व्यक्तिमत्त्व’ म्हणून सगळ्यांनाच परिचित होते. या सर्वाची जाण त्यांना होती. आणि ही जाणीवच अपेक्षांचं ओझं बनून योहानच्या डोक्यावर बसत चालली होती. आता योहानचीही एक वैशिष्टय़पूर्ण अशी बाजू होती जी त्याला इतर सर्वसाधारण विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा असा बनवत होती. योहानला ‘अध्ययन अक्षमता’ (Learning Disability) होती आणि त्यामुळेच तो अभ्यासात मागे पडलेला होता. त्याला गणितातली आकडेमोड असो किंवा भाषेमधील शब्द/ जोडाक्षर असो तसेच वाचन यापैकी काहीही करायला जमत नव्हते. जमत नव्हते म्हणण्यापेक्षा तो हे सर्व करण्यास अक्षम होता.

मात्र किशोर सरांचे मन हे वास्तव स्वीकारायला तयार नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘योहानने जर ठरवलं आणि स्वतःमध्ये थोडीफार नियमितता आणली तर तो यावर नक्की मात करू शकेल.’ आणि हेच त्यांचं त्याला ठसवणं जास्तीत जास्त त्याला त्यांच्यापासून दूर नेत होतं.

योहान आता अभ्यास न करण्याची कारणं देऊ लागला होता. जास्त वेळ व्हिडीओ गेम्स खेळण्यात घालवू लागला होता. त्याचं खोटं बोलणंही वाढत चाललेलं होतं. हे सर्व किशोर सरांसाठी असह्य झालेलं होतं. त्यांना आता त्यांच्या पत्नीचाही राग येत होता.

‘मॅडम, मीच सगळी टेन्शन्स घेतोय. माझ्या बायकोला योहानची काहीच काळजी नाही. मी शाळेत जाताना तिला योहानचा अभ्यास कसा घे हे सांगून ठेवतो, पण ती एवढंही नाही करत. त्याला कंट्रोल नाही करत आणि हा आळशी असाच टाइमपास करत राहतो दिवसभर’. त्यांच्या बोलण्यातून हे अगदी स्पष्ट होतं की ते योहानसाठी प्रामाणिक प्रयत्न करत होते.

‘मी आता अजून काय करू? माझी घुसमट होतेय. लोकं काय म्हणतील? एका मास्तराचा मुलगा ‘ढ.’ त्यांनी बोलता बोलता योहानच्या वह्या त्यांनी समुपदेशकाला दाखवल्या ज्यामध्ये शुद्धलेखनाच्या चुका होत्याच शिवाय गणितातली आकडेमोडही चुकीची होती.

योहानला जेव्हा वाचायला सांगण्यात आले तेव्हाही तो गोंधळत होता. किशोरसरांनी बोलताना हेही स्पष्ट केलं की, त्यांनी त्याच्या शाळेच्या सूचनेनुसार योग्य त्या मानसशास्त्रीय चाचण्या केल्याही होत्या ज्या योहानची ‘अध्ययन अक्षमता’ दाखवत होत्या. आणि हेच सरांचे दुःख होते.

‘अध्ययन अक्षमता’ (Learning Disability) ही अशी मानसशास्त्रीय अवस्था आहे जी जर मुलांमध्ये योग्य वेळी समजून नाही आली तर त्याचे दूरगामी परिणाम हे मुलांबरोबर पालकांनाही त्रासदायक असतात.

अध्ययन अक्षमता असेल तर मूल हे बऱ्याचशा मानसिक त्रासातून जात असते. ‘मला अभ्यास कळत नाही म्हणून मी करत नाही’ हेही मूल आपल्या पालकांना पटवून देऊ शकत नाही कारण कोणीही विश्वास ठेवणार नाही हा नैराश्यपूर्ण विचार त्यांच्या मनात असतो. त्यांचे पालकही मग ‘आपण कुठे कमी पडलोय का?’ या विचाराने अधिकाधिक केविलवाणे प्रयत्न करत राहतात.

हे सगळं टाळायचं असेल तर सर्वप्रथम ‘अध्ययन अक्षमते’बद्दलचे गैरसमज मनातून काढून टाकले पाहिजेत. अध्ययन अक्षमता असणं म्हणजे ‘वेडं किंवा मंद असणं नाही’. याउलट अध्ययनातील काही गोष्टी जसे की जोडशब्द व्यवस्थित वाचायला किंवा लिहायला न जमणं. उलटसुलट शब्द लिहिणं, ज्याला Dyslexia आणि Dysgraphia म्हणतात. अक्षरांच्या साधर्म्यामुळे (dog ऐवजी bog, ‘बदक’चा ‘ब’ उलटा) शब्द चुकीचा लिहितात. अशी मुलं दिशा चुकू शकतात किंवा भरपूर सूचना दिल्या असतील तर गोंधळ घालू शकतात. त्यांना स्वतःच्या वस्तूंचे म्हणजे कपाट लावणे, दप्तर भरणे यांचे नियोजन जमत नाही.

आकडेमोड किंवा गणितातील चिन्हे यांचे आकलन नीट होत नसेल तर त्याला Dyscalculia असे म्हणतात. वरीलपैकी तिन्ही अवस्था जर मुलामध्ये असतील तर त्याला ‘अध्ययन अक्षमता’ म्हटले जाते. आपण विचार करू शकतो की असे मूल कुठल्या नकारात्मक अवस्थेतून जात असेल आणि त्याची होणारी घुसमट पालकांना अजूनच अस्वस्थ करून जाते. किशोर सरांचा हीच मोठी समस्या होती. ते योहानला असे बघू शकत नव्हते. ते एका बाबतीत ठाम होते की ‘माझा मुलगा हा गुणी आहे. प्रेमाने सांगितलेल्या गोष्टी त्याला समजतात, पण माझा संयम संपतोय. कारण लोक काय म्हणतील?’ त्यांना आता मानसिक आधाराची गरज होती जी समुपदेशनाने पूर्ण केली. त्यांना आत्मविश्वास दिला गेला. तसेच योहानसाठी पुढील उपचारांची दिशाही ठरवण्यात आली ज्यामध्ये Remedial therapist, Occupational therapist यांचीही मदत घेण्यात आली.

योहानला आता ‘अध्ययन अक्षमते’चे अधिकृत प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्याला बऱ्याच सुविधा मिळाल्यात. तो आता परीक्षेत कॅलक्युलेटर वापरू शकतो, त्याला पेपर लिहायला थोडा अधिक वेळ दिला जातो. (काही मुलांना लेखनिकही उपलब्ध करून देण्यात येतात). तसेच त्याला एक भाषा आणि गणिताऐवजी वेगळे सोपे विषय घेण्याची सुविधा असल्याने आता त्याला अभ्यास सोपा होत जातोय.

किशोरसरही आता बरेचसे समाधानी आहेत. तेही तज्ञांच्या मदतीने योहानकडे लक्ष ठेवून आहेत. त्याच्या प्रगतीने खूश आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त ‘माझा मुलगा आयुष्यात नक्कीच पुढे जाईल’ या विचाराने तणावरहीत आहेत.
(लेखिका मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक आहेत.)

 [email protected]