गावाकडची दिवाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> इंद्रजित भालेराव

निसर्गातली हिरवाई रानात दाटून आलेली असते. भरल्या पिकाचा आनंद डोळय़ांत मावत नाही. हीच दिवाळी डोळय़ांतून काळजात उतरते आणि मग काळजातून अंगणात उतरते. शाळेत जाण्याऐवजी शेतात जावंसं वाटतं. तिथूनच सुरू होते गावाकडची दिवाळी.

पावसाळा संपून आकाश निर्मळ, निरभ्र झालेलं असतं. रात्री स्वच्छ चांदणं पडतं. कोजागिरी येते. तिथून दिवाळीची चाहूल सुरू होते.
रानातली सारी। रोगराई हाटे
जिथे तिथे भेटे। हिरवाई
नदीतले पाणी। होऊन निर्मळ
वाहे खळखळ। दिवाळीत
निसर्गातली हिरवाई रानात दाटून आलेली असते. भरल्या पिकाचा आनंद डोळय़ांत मावत नाही. हीच दिवाळी डोळय़ांतून काळजात उतरते आणि मग काळजातून अंगणात उतरते. शाळेत जाण्याऐवजी शेतात जावंसं वाटतं. तिथून दिवाळी सुरू होते. म्हणूनच बहुधा दिवाळीच्या सुट्टय़ा सुरू होतात.
घरात दिसती। धनधान्य राशी
शेतातही खुशी। जागोजाग
हवाही वाहते। निर्मळ निर्मळ
मनातला मळ। दूर होतो
उन्हाळा भिवून पाडण्याच्या दिवशी पारामागं जाऊन घोंगडी पांघरून बसलेली थंडी दसऱयाच्या दिवशी गावात शिरते. तरणी पोरं आणि तरणे बैल तिच्याशी झुंजायची तयारी सुरू करतात तेव्हा दिवाळी सुरू होते-
घुमती आखाडे। पहिलवानांचे
कणखर तनांचे। कष्टकरी
खाऊनिया चारा। हिरवा हिरवा
भोगुनी गारवा। पुष्ट बैल
पावसानं मिटलेल्या रानावनातल्या, बांधावरच्या वाटा माणसांच्या वर्दळीनं पुन्हा उमटायला लागतात. या वाटांनी निमंत्रणाची शिदोरी घेऊन भाऊ बहिणीकडं निघालेला असतो, तेव्हा दिवाळी सुरू होते. मामाच्या बोटाला धरून गतीनं चालणारा भाचा आणि पाठीमागं माहेराच्या ओढीनं धाव घेणाऱया बहिणी रस्तोरस्ती दिसू लागल्या की, दिवाळी गतीनं गावात येऊ लागल्याची चाहूल लागते.
दिवाळीचा सण। गाईवासरांचा
माम्या भाचरांचा। आनंदाचा
गाईवासरांच्या पूजनानंच दिवाळीचा पहिला दिवस उगवतो. शेणाचा काला करून त्याचा एक संपूर्ण गायवाडा तटबंदीसह केला जातो. सगळे काही शेणाचेच-
शेणाच्याच गाई। शेणाचाच बळी
शेणाचे गवळी। गाई मागे
शेणाचे पांडव। शेणाचा श्रीकृष्ण
दूधही धारोष्ण। उतू जाई
ज्या दिशेला जाते। दुधातले उतू
तिथे पीक उतू। येते म्हणे
दिवाळीचा दुसरा दिवस सुरू होतो स्वयंपाकघरात. त्याचा सुगंध दरवळतो सगळय़ा गावात. माय आणि आलेल्या बहिणी टोपलं टोपलं भरून तळण करतात. घरातल्या खंडीभर माणसांना पुरण्यासाठी तळणही खंडीभर करावं लागतं. शेतात राबणाऱया कामावरच्या गडय़ांनाही पंगतीत घेतलं जातं तेव्हा दिवाळी भरात आलेली असते.

आम्ही शेतातून आणलेला नागरमोथा तिळासह कुटून त्यात हळद मिसळून आई अंगाला रगडू लागली की, दिवाळीच्या तिसऱया दिवसाची चाहूल लागते. गरम पाण्यानं पाठ रगडून बहिणी आंघोळ घालतात. कपाळावर पुंकू लावून आई ओवाळते. बोटव्याच्या भातावर दूध-तूप-साखर टाकून आई ताट समोर ठेवते तेव्हा दिवाळीचा तिसरा दिवस उगवलेला असतो.

लाल रंगाचा नवा करदोडा बांधून स्वयंपाकघरातल्या विळीनं आई जुना करदोडा कापून टाकते. कधी कधी आईच्या हातातल्या करदोडय़ाचा गुंता होतो. तो गुंता आईला उकलेना म्हणून आपण ताब्यात घेऊन उकलायला लागलो की, आपल्याही बुट्टीचं बळ पणाला लागतं. आपण हा करदोडय़ाचा गुंता सोडत असतो तेव्हा मुठीचा मुटका गालाला लावून समोर बसलेली आई नात्यागोत्याचा गुंता सोडवत असते. कारण हा गुंता सोडवण्यासाठी दिवाळीइतके नातेवाईक पुन्हा कधी एकत्र येणार नसतात.

पुढचे दोन दिवस गावातल्या दिवाळीत फारसे महत्त्वाचे नसतात. ते केवळ दुरडीतलं तळण संपवण्याचे आणि आनंदानं संगमंगं गुज बोलण्याचे असतात, लेकीबाळींच्या मनात दिवाळी संपत आल्याची हुरहुर निर्माण करणारे असतात. बापानं बाजार करून आणल्यावर लुगडय़ाच्या रंगावरून बहिणीनं एकमेकांवर नाराज होण्याचा दिवसही उगवतो. कधी कधी ही नाराजी घेऊनच सासरी जाण्याची वेळही येते.

बहिणींना परत सासरी नेऊन सोडताना दिवाळीही त्यांच्या सोबतच निघून गेल्याची भावना बहिणीसोबतच भावाच्या मनातही येते. सगळय़ांच्याच मनात हूरहूर दाटून येते. या हुरहुरीतूनच सगळय़ांच्या मनात प्रार्थना दाटून येते-
गाईवासरांनी। भरू देत गोठे
धान्याचेही साठे। घरोघरी
सुखी सर्व राहो। एवढी प्रार्थना
दिवाळीच्या सणा। ऐक माझी