गृहनिर्माण क्षेत्राची पूर्वपदाकडे वाटचाल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रणजित नाईकनवरे

कोरोना काळातील विस्कटलेली सर्वच व्यवसायांची घडी आता हळूहळू का होईना, पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मागील दीड वर्षात ठप्प असलेले व्यवसाय काही प्रमाणात वेग घेत असताना गृहनिर्माण क्षेत्रदेखील आपली वाटचाल करण्यास सज्ज झाले आहे.

देशातील लाखो लोकांना रोजगार पुरविणारे दुसऱया क्रमांकाचे क्षेत्र असलेले व जीडीपीमध्ये किमान 5 ते 7 टक्के इतका वाटा असलेले बांधकाम व्यवसाय क्षेत्र नजीकच्या भविष्यासंदर्भात आशावादी आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आणि सध्या सुरू असलेला सण व उत्सवांचा काळ यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहेच, शिवाय टाळेबंदीच्या काळात नागरिकांना स्वतःचे घर असल्याचे फायदे लक्षात आल्यानंतर गृहखरेदी करण्यास ग्राहकदेखील उत्सुक असल्याचे चित्र आहे.

ही सद्य परिस्थिती असली तरी दीड वर्षाचा हा काळ या क्षेत्रासाठी कठीण काळ होता. एकीकडे टाळेबंदीमुळे परराज्यातील मजूर आपापल्या घरी परतले, तर दुसरीकडे आर्थिक संकटे व ग्राहकांना वेळेत प्रकल्प पूर्ण करून देणे यामध्ये बांधकाम व्यावसायिक अडकला, परंतु या संकटाच्या काळातही या क्षेत्राने हार न मानता लढा दिला आणि आता कुठे हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येत असल्याची चिन्हे आपल्याला दिसत आहेत.

टाळेबंदीदरम्यान क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले. ज्यामध्ये शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन खाटांसोबत डिफ्रिब्रिलेटर, सक्शन मशीन व ईसीजी मशीन उपलब्ध करून देण्यात आले होते. बाणेर येथील महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयाला पाच व्हेंटिलेटर व हाय फ्लो ऑक्सिजन डिव्हाईस, पिंपरी- चिंचवडमधील थेरगाव येथील महानगरपालिका कोविड रुग्णालयालादेखील पाच व्हेंटिलेटर व हाय फ्लो ऑक्सिजन डिव्हाईस आणि डी. वाय. पाटील रुग्णालयात खास पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या कक्षासाठी पाच व्हेंटिलेटर व्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले.

टाळेबंदीच्या काळात बांधकाम व्यावसायिक व व्रेडाई पुणे मेट्रोने आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेत प्रकल्प साईटवरील बांधकाम मजुरांची सर्व जबाबदारी स्वीकारली. त्यांना जेवण, अन्नधान्य, औषधे व इतर आवश्यक वस्तूंबरोबर मास्क वापरण्याच्या पद्धती, शारीरिक अंतराचे महत्त्व, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वेळोवेळी तपासणी, संसर्ग झाल्यास विलगीकरण व इतर उपचार आदी गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिले. याच काळात त्यांचा काwशल्य विकास व्हावा यादृष्टीनेदेखील प्रयत्न करण्यात आले.

टाळेबंदी उठल्यानंतर आता खास बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी महालसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत आजवर पुणे शहरातील 20 हजारांहून अधिक कामगारांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पिंपरी-चिंचवड भागातही महालसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे महत्त्वाचा आणखी एक घटक असलेल्या ग्राहकांना घरबसल्या प्रकल्पांची माहिती, व्हर्च्युअल रिऑलिटी अर्थात व्हीआरच्या माध्यमातून बांधकाम प्रकल्पांचा व सदनिकांचा आभासी अनुभव देणे, मोबाईल, इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक साधने, झूम कॉल याद्वारे संपर्क साधणे या गोष्टीदेखील बांधकाम व्यावसायिक निष्ठsने करीत होते. त्याचाच परिणाम म्हणून ग्राहक गृहनोंदणीला सकारात्मक प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत.

शिवाय आज बाजारपेठेत घरखरेदीसाठी उत्तम पर्याय आणि संधी दोन्ही उपलब्ध असल्याने भविष्याचा विचार करता इतर कोणत्याही क्षेत्रातील गुंतवणुकीपेक्षा बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक हा सर्वसमावेशक व उत्कृष्ट पर्याय म्हणून समोर आला.

महारेराच्या कायद्यांमुळे आता गृहखरेदी व त्यामधील गुंतवणूकही आणखी सुरक्षित झाली असून बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या वेळेत घरे हस्तांतरित करावी लागत असल्याने यामध्ये ग्राहकांचाच फायदा होत आहे. शिवाय टाळेबंदीच्या काळात महारेराने प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची वेळ काही काळ पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतला त्याचा फायदाही बांधकाम व्यवसायाला झालेला पहायला मिळाला.

बांधकाम क्षेत्र हे रोजगार पुरविणारे देशातील दुसऱया क्रमांकाचे क्षेत्र असून किमान 250 हून अधिक उद्योग हे या क्षेत्राशी निगडित आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील विक्रीमध्ये वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेलादेखील चालना मिळू शकणार आहे.

नजीकच्या भविष्याचा विचार केला तर शहरात होणारी विकासकामे, दृष्टिपथात असलेला मेट्रो प्रकल्प, येऊ घातलेला रिंग रोड व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखडय़ाच्या ड्राफ्टअंतर्गत होणारा विकास हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भविष्यात येणाऱया पुणे मेट्रो, निओ मेट्रो प्रकल्पांमुळे आजूबाजूच्या परिसरातील एफएसआय वाढून त्याचा फायदा होईल, शिवाय पुणे शहराचा आमूलाग्र विकासही होईल.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विकास आराखडा बांधकाम व्यवसाय क्षेत्राला आणखी चालना देईल. याअंतर्गत होणाऱया क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे पुणे शहर हे राहण्यासाठी हिंदुस्थानातील सर्वोत्तम शहर तर बनेलच, शिवाय त्यामुळे स्थानिकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासालादेखील गती मिळेल.

याअंतर्गत येत्या काही वर्षांत शहर व परिसरात तब्बल 26 लाख रोजगारांच्या संधी वाढून नजीकच्या भविष्यात नवीन घरांची आणि व्यावसायिक जागांची वाढलेली मागणीदेखील पाहायला मिळेल. एकूणच पूर्वपदावर येत असलेले बांधकाम क्षेत्र हे आता आशावादी भविष्याच्या दिशेने झेप घेण्यास सज्ज झाले आहे.

n गृहकर्जावरील ऐतिहासिक म्हणावा असा सर्वाधिक कमी व्याजदर सध्या आकारला जात आहे, यापेक्षा व्याजदराच्या किमती कधी कमी होतील, हे सांगता येणार नाही. महिलेच्या नावावर घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत, व्याजाच्या रकमेवर टॅक्स बेनिफिट मिळत आहे. वाढती मागणी, मर्यादित पर्याय, सिमेंट आणि स्टीलच्या आश्चर्यकारकरीत्या वाढत्या किमती यामुळे नजीकच्या भविष्यात बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीच्या किमती बांधकाम व्यावसायिकांची इच्छा नसतानाही वाढणार आहेत. ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेत बांधकाम व्यावसायिक आपल्या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने मोक्याची व कामाच्या दृष्टीने सोयीची ठिकाणे, हवेशीर खोल्या, आरोग्याशी संबंधित सुविधांची सोय, आयसोलेशन सुविधा यांबरोबर घरामधून काम करण्याच्या दृष्टीने अपेक्षित बदल यांचादेखील समावेश करताना पाहायला मिळत आहे.

(लेखक क्रेडाई पुणे मेट्रो या बांधकाम व्यावसायिक संघटनेचे उपाध्यक्ष आहेत.)