
रिक्षाच्या हुडला छिद्र पाडल्याचा मित्रावर संशय घेतला म्हणून संतापलेल्या दोघा तरुणांनी रिक्षा मालकाच्या पोटात चाकू खुपसून तसेच जबर मारहाण करून हत्या केली. त्यानंतर आरोपींनी पळ काढला. पण शिवाजी नगर पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेऊन चार तासांच्या आत फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
मृत तरुण मन्नानची रिक्षा असून त्याच्या रिक्षाच्या हुडला कोणीतरी छिद्र पाडले होते. हे कृत्य तौसिफने केल्याचा संशय मन्नानने घेतला होता. यातून वाद झाला आणि तौसिफचा मित्र आफताबने मन्नानच्या पोटात चाकू खुपसला. मग तौसिफने तो चाकू पोटात फिरवला. इतक्यावरच न थांबता फिना अन्सारी ऊर्फ पन्ना याने मन्नानला मारहाण केली. मन्नान रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला पाहून तिघांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून शिवाजी नगर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक बाबींचा अभ्यास करून पोलिसांनी खबऱयांना कामाला लावले. त्यानंतर चार तासांच्या आत पोलिसांनी तौसिफ, आफताब आणि पन्ना या तिघांना शोधून गजाआड केले.


























































