मुंबईतील नगरसेवकांची संख्या 227 वरून 236

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - संदीप पगडे

मागील वीस वर्षांत लोकसंख्येत झालेल्या वाढीनुसार मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या नऊने वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार वॉर्डस्ची संख्या 227 वरून 236वर जाणार असून याविषयीचा अध्यादेश लवकरच काढण्यात येणार आहे. त्यानंतर वॉर्डची फेररचना होणार आहे. 2022च्या निवडणुकीत 236 नगरसेवक महापालिकेवर निवडून येणार असल्याने ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.

मुंबई महापालिका अधिनियमातील 1888च्या तरतुदीनुसार महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 227 इतकी आहे. ही संख्या 2001च्या जनगणनेच्या आकडेवारी आधारे निश्चित केली आहे. 2011च्या जनगणनेनंतरही निवडून येणाऱया सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही. सन 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार 2001 ते 2011 या दशकात मुंबई महापालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये 3.87 टक्के वाढ झाली आहे. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण लक्षात घेऊन वाढीव प्रतिनिधित्व निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नगरसेवकांची संख्या 236 करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याबाबत लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असून यानंतरच प्रभाग रचनेवर काम सुरू होईल. तसेच महापालिका निवडणुकीआधी हे काम पूर्ण होईल. दरम्यान, कोणत्या विभागात किती वॉर्ड वाढवायचे याचे नियोजन महापालिका करणार आहे. याचा प्रस्ताव लवकरच महापालिका तयार करणार आहे.

मूलभूत सुविधांसाठी निर्णय

सन 2001 नंतर गेल्या वीस वर्षात मुंबईच्या लोकसंख्येत मोठी भर पडली आहे. मतदारवाढीचं प्रमाण आणि वाढत्या नागरिकरणामुळे नगरसेवकांच्या संख्येमध्ये वाढ करणे गरजेचे होते. जेणेकरून या प्रभागातल्या नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा देणे आणि त्याचा समतोल राखणे आवश्यक होते, म्हणून आज सदस्य संख्यावाढीचा निर्णय मंत्रमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.