विजय पाटील करणार बीसीसीआयमध्ये एमसीएचे प्रतिनिधित्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) प्रतिनिधित्व करणार आहेत. एमसीए कार्यकारिणी बैठकीत शुक्रवारी तशा ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. एमसीएच्या शुक्रवारी झालेल्या कार्यकारिणी बैठकीत संघटनेच्या आस्थापनात काम करणाऱ्या कामगारांसाठी कर्मचारी कल्याण योजनेलाही मंजूरी देण्यात आली. त्याशिवाय संघटनेशी संलग्न क्लब्सना सबसिडी देण्याचाही निर्णय घेण्यात आला. या सबसिडीच्या वाटपासाठी नियुक्त सल्लागार समितीवर रवी सावंत ,डॉ. पी. व्ही. शेट्टी ,पंकज ठाकूर ,अशोक प्रधान आणि अभय हडप या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यूझीलंड-हिंदुस्थान संघांतील दुसरी कसोटी लढत 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या लढतीसाठी 100 टक्के क्रिकेटशौकिनांना लढतीला उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करणारे पत्र एमसीएने केंद्र सरकारला लिहिले आहे.