
पंतनगर पोलिसांनी एका नवजात बालिकेला जीवदान देण्याचे काम केले आहे. निर्दयी मातेने आपल्या पोटच्या मुलीला कपडय़ात गुंडाळून रात्रीचा फायदा घेत गटारात फेकले होते. हा प्रकार कळताच पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या चिमुकलीला आपल्या ताब्यात घेतले. त्या चिमुकलीची सध्या राजावाडी रुग्णालयात देखभाल केली जात आहे.
रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पूर्व प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षाला कॉल आला आणि रमाबाई कॉलनीतील एका नाल्यात नवजात बालिका असल्याची माहिती देण्यात आली. नियंत्रण कक्षाकडून ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी निर्भया पथकासह घटनास्थळी लगेच धाव घेतली. तेव्हा नाल्यामध्ये कपडय़ात गुंडाळलेली गोंडस चिमुकली सापडली. आईचा विरह आणि उघडय़ावर फेकल्याने त्या चिमुकलीचे रडून बेहाल झाले होती. महिला अंमलदार सोनावणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच त्या चिमुकलीला ताब्यात घेऊन तिला मायेची ऊब दिली. पोलिसांनी लगेच चिमुकलीला राजावाडी रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार केले. सध्या राजावाडी रुग्णालयात मुलीची देखभाल केली जात असून पोलीस तिच्या मातेचा शोध घेत आहेत.
मांजराचे ओरडणे बालिकेला ठरले मदतगार
बालिकेला नाल्यात फेकल्याचे कोणालाही समजले नाही, पण काही वेळानंतर तेथे आलेले मांजर बालिकेला बघून मोठमोठय़ाने ओरडू लागले. मांजराचे ओरडणे ऐकून तेथेच राहणारे सुरेंद्र रणपिसे बाहेर आले. मांजर का ओरडते ते पाहिले असता कपडय़ात गुंडाळलेले बाळ रणपिसे यांना दिसले. त्यामुळे रणपिसे यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधून माहिती दिली होती.































































