
कोरोना नियंत्रणात आल्याने महाविद्यालयांची घंटा पुन्हा वाजली खरी परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र 20 टक्क्यांच्या वर गेलेली नाही. अनेक विद्यार्थी फक्त विज्ञान विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठीच प्रत्यक्ष हजेरी लावत आहेत. कारण अनेक विद्यार्थ्यांचे कोरोना लसीचे दोन डोस अद्याप घ्यायचे बाकी आहेत. तर काहींना आजही ऑनलाइन शिकवणीच योग्य असल्याचे वाटत आहे. शिक्षकांची मात्र त्यात अडचण झाली आहे. कारण ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने शिकवणे त्यांना शक्य नाही.
अनेक महाविद्यालयांनी आपले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण पूर्ण केले आहे. त्यानंतरही तिथे विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य दिसून येत आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सक्ती नसल्याने आणि ऑनलाइन शिकवणीचा पर्यायही उपलब्ध असल्याने महाविद्यालयांमधील वर्गांमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.
महाविद्यालये सुरू होऊनही विद्यार्थी येत नसल्याने काही महाविद्यालये फक्त विज्ञानाच्या प्रात्यक्षिक परीक्षाच ऑफलाइन घेत आहेत. त्यात गिरगाव चौपाटीजवळील विल्सन महाविद्यालयाचा समावेश आहे. विल्सनमधील अनेक विद्यार्थी हे राज्याबाहेरील आहेत. ते वसतिगृहांमध्ये राहून शिक्षण घेत आहेत. परंतु वसतिगृहे सुरू करण्याबाबत काहीच सूचना नसल्याने त्या विद्यार्थ्यांना परत बोलवता येत नाही असे महाविद्यालय व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. मुंबईत राहणाऱया विद्यार्थ्यांपैकी बऱयाचशा विद्यार्थ्यांचा अजूनही लसीचा दुसरा डोस बाकी आहे. त्यामुळे विल्सनमधील शिक्षक घरी राहून पिंवा महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून किंवा मग वर्गामध्ये बसून ऑनलाइन शिकवणी घेत आहेत.
बहुतांश विद्यार्थ्यांनी स्वीकारला ऑनलाइनचा पर्याय
के. सी. महाविद्यालय, रुईया महाविद्यालय, एन. एम. महाविद्यालय, खांडवाला महाविद्यालय आदी महाविद्यालयांमधील परिस्थितीही अशीच आहे. तिथे जेमतेम 10 ते 20 टक्केच विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहत आहेत. लसीकरण पूर्ण झाले नाही हे कारण प्रत्येकाचे आहेच, पण बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑनलाईनचाच पर्याय स्वीकारला आहे. काही महाविद्यालयांमध्ये बीएसस्सी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित राहत आहेत परंतु आर्ट्स अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.
ऑनलाईन शिकवणीत शिक्षकांची अडचण
ऑनलाईन शिकवणीत तोंडी माहिती देता येऊ शकते पण एखादी समस्या फळ्यावर सोडवून सांगता येत नाही. विज्ञान आणि भौतिकशास्त्र्ााच्या विद्यार्थ्यांना आकृत्यांच्या माध्यमातून शिकवावे लागते. ऑनलाईनमध्ये तीसुध्दा एक प्रमुख अडचण ठरते असे महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शिक्षक सांगतात. दिवाळीनंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल अशी शक्यता होती. परंतु अद्याप तसे दिसून आलेले नाही. कदाचित डिसेंबरमध्ये विद्यार्थीसंख्या वाढेल असाही त्यांचा अंदाज आहे.



























































