
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी राबविण्यात आलेली प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य विशेष फेरी 3 ची मुदत आता संपली असून अद्यापही जागा रिक्त असल्याने अकरावी प्रवेशासाठी उत्सुक विद्यार्थ्यांसाठी उद्या 23 नोव्हेंबरपासून शिक्षण उपसंचालक स्तरावर समुपदेशन फेरी राबविण्यात येणार आहे.
अद्याप कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश हवा असल्यास अशा विद्यार्थ्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात संपर्क साधायचा आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याविषयी शिक्षण उपसंचालक मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या कॉलेजमध्ये जागा रिक्त असल्यास अशा विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमधील जागा अलॉट केली जाणार आहे.
दरम्यान, मुंबई विभागात अकरावीच्या अद्याप 66 हजार 901 जागा रिक्त असून प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य विशेष फेरी 3 मध्ये ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 293 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले असून 1 हजार 226 जणांनी प्रवेश घेतले आहेत. 4 विद्यार्थ्यांनी मिळालेला प्रवेश रद्द केला असून 63 जणांनी कॉलेज अलॉट होऊनही संबंधित कॉलेजशी संपर्क साधलेला नाही.
























































