परीक्षण : स्त्री मनाचा तळ शोधणाऱ्या कथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रा. सुजाता राऊत

डॉ. प्रतिभा कणेकर या समीक्षा, संशोधनाबरोबरच कथालेखिका म्हणूनही परिचित आहेत. मोजक्याच, पण सर्जनशील कथालेखनातून त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. ‘कौलं उडालेलं घर’ हा त्यांचा दुसरा कथासंग्रह. यातील काही कथा पूर्वी महत्त्वाच्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत, पण आज वाचतानाही त्यांच्यात समकालीन संदर्भांचे धागेदोरे मिळतात. याचं कारण हे लेखन फक्त कथनाच्या पातळीवर नसून जीवनाच्या समग्रतेला भिडणारे आहे.

या सर्व कथा स्त्रीकेंद्री आहेत, पण म्हणून एका विशिष्ट विचार प्रणालीतून त्या निर्माण झाल्या आहेत असा शिक्का त्यावर मारावा वाटत नाही. यातील पात्रे, त्यांचे भावविश्व, त्यांचे स्वभावचित्रण अतिशय स्वाभाविकपणे आले आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रश्न व एकमेकात गुंतलेले धागे तरलपणे चित्रित केले आहेत. पात्रांचा मानसिक प्रवास दाखवत जातानाच लेखिका बारीकसारीक तपशिलातून भवतालाचे हुबेहूब चित्रण करते.

या कथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत. त्यात अर्थातच नायिका मध्यवर्ती आहेत. यातील बहुतेक सर्व नायिका अत्यंत जबाबदार, परिस्थितीला शांतपणे तोंड देणाऱ्या, आयुष्यातल्या त्यावेळच्या प्रश्नांना भिडणाऱ्या आहेत. त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचे भान आहे आणि त्या जगण्यातल्या अनेक वाटांकडे डोळसपणे, क्वचित तटस्थपणेही पाहू शकतात. ‘रेणूच्या आई’ या कथेत स्वतःच्या मुलीच्या आयुष्याची रेघ अस्ताव्यस्त झाल्याने तिच्याविषयी सतत विचार करणारी, जगण्यातल्या अनपेक्षित प्रश्नांना स्वतःच्या सामर्थ्यानिशी भिडणारी रेणूची आई आहे. रूढार्थाने पारंपरिक कौटुंबिक चौकटीत बंदिस्त असणारी अशी ही व्यक्तिरेखा वाटली तरी तिचं आईपण आणि त्यातून तिच्या व्यक्तिमत्त्वात आलेलं सामर्थ्य, तिचं मुलीत गुंतणं, तिच्याविषयी संवेदनशील असणं हे अतिशय ठळकपणे उमटलं आहे. बारकाईने तपशील भरत जाण्यामुळे ही कथावस्तू सघन होत जाते.

‘आजी आणि जेनेट’ या कथेत कथानायिकेची मैत्रीण असणारी जेनेट व नायिकेची आजेसासू या अत्यंत भिन्न व्यक्तिरेखा आपल्या समोर येतात. जेनेट चीनमधल्या निर्वासित कुटुंबातून येथे आलेली व इथल्या मातीत मिसळलेली आहे. ती सतत कुटुंबाचा भार वाहत राहिलेली, कुटुंबावर प्रेम करणारी, अतिशय जबाबदार अशी, लग्नाचं वय उलटून गेलेली स्त्री आहे. तिच्याविषयी कथेतील निवेदिकेला कुतूहल व आदरही आहे. आजी व जेनेट या दोघींचं पर्यावरण कितीतरी वेगळं आहे. त्यांना जन्मजात मिळालेलं वातावरण, त्यांची नाती, त्यांचे अनुभव यात वरवर सारखेपणा नाही, पण तरीही दोघींच्या जगण्यात काहीतरी समान धागा आहे. जेनेटला प्रेमाची ओढ आहे आणि तिने तिच्या आयुष्यातले प्रश्न समजून घेतले आहेत व त्यावर उत्तरही शोधलं आहे. याचा धागा आजींच्या मनाशीही जुळतो. .

‘दोघी’ या कथेत सोसायटीत घरकाम करून पैसे साठवून स्वतःचा संसार थाटण्याचं स्वप्न बघणाऱ्या दोघी बहिणी नजमा आणि सईदा आहेत. घरातली छोटीशी जागा, अनेक माणसं, तिथला पोरवडा, व्यसनी भाऊ यामध्ये अडकलेल्या या कष्टाळू तरुण मुली, त्यांचं रोजचं जगणं, त्यांच्या तरुण मनात पडणारे प्रश्न, त्यातले पदर लेखिकेने हळूहळू उलगडून दाखवले आहेत. यातून मुस्लिम समाजाचं चित्रही समर्थपणे दाखवलंय.

‘कौलं उडालेलं घर’ या शीर्षक कथेत अनेक चुलत, आत्येबहिणी बऱ्याच काळानंतर मूळ घरात एकत्र आल्या आहेत. एक रात्र त्या एकमेकींसमवेत काढून आनंदी आठवणी काढायचं असं ठरवतात आणि मग उलगडत जातो आठवणींचा चित्रविचित्र कोलाज. गीता प्रथम घरी पोहोचते व नंतर तृतीय पुरुषी निवेदनातून कथा पुढे सरकते. या कथेतही अनेक पात्रं आहेत. त्यांचे परस्पर संबंध, त्यांच्या वयानुरूप येणाऱ्या प्रतिक्रिया व प्रतिसाद यातून स्त्री जीवनाची वीण उलगडत जाते.

संग्रहातील कथांची शीर्षके आगळीवेगळी व सूचक आहेत हेही संग्रहाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. ‘कॅलिडोस्कोप झेंटँगल आणि कँडीक्रश’ या कथेतील विभा विचारी, जबाबदार अशी प्रौढ वयातली स्त्री आहे. या कथेला लॉक डाऊनचा संदर्भ असला तरी ती फक्त लॉक डाऊनपुरती मर्यादित नाही. यातून घडणारा मनाचा प्रवास, निर्माण झालेले विचार, चिंतन हे पुन्हा जगण्याच्या मूलभूत संदर्भांशी येऊन पोहोचतं. त्यातील सर्वच नायिकांची समज व विचारांचा परीघ विस्तारत जाणारा आहे.

‘देहदुःख’मधली मेहरू, तिची मैत्रीण दुर्गा, दुर्गाची वहिनी विजया, मेहरूची अम्मी, दुर्गाची आई अशा अनेक व्यक्तिरेखा आपल्यासमोर तंतोतंत उभ्या राहतात. बाई कोणत्याही धर्मातील, जातीतील असो, तिला येणारे समाजाचे अनुभव थोडय़ाफार फरकाने सारखेच असतात आणि शेवटी माणुसकीचा धर्मच अंतिम हेही कथा अधोरेखित करते.

मानवी आयुष्यातल्या अनेक लहानमोठय़ा पैलूंना स्पर्श करत, मानवी स्वभावाचे कंगोरे रेखाटत या कथा समोर येतात. त्या कधी कधी दीर्घकथेकडेही झुकतात. कारण फक्त कथाबीज नव्हे, तर वातावरण निर्मिती व स्वभाव चित्रण तपशिलात करणे कणेकरांचे वैशिष्टय़ आहे. या कथांमध्ये एकाच वेळी अनेक पात्रे आपल्यासमोर येतात. त्यांच्या लकबी, स्वभावचित्रण, पात्रांचं दिसणं, त्यांचे संवाद, त्यातून समोर येणारा त्यांच्या मनाचा पोत हे सगळं काही कथेत अधोरेखित होतं.

‘याऊस’ या समीक्षकाने प्रेक्षक (वाचक) पात्रांशी कसा तादात्म्य पावू शकतो हे सांगितले आहे. वाचकाला सहभाग तत्त्वाची अनुभूती येते (असोसिएट आयडेंटिफिकेशन). प्रमुख पात्रांविषयी कौतुक व आदर यामुळे तो तादात्म्य पावतो (ऍडमायरिंग आयडेंटिफिकेशन) किंवा पात्रांच्या जागी वाचक स्वतःला पाहतो तेव्हा सहानुभूतीयुक्त तादात्म्य (सिम्पथेटिक आयडेंटिफिकेशन) अशा प्रकारच्या शक्यता याऊसने सांगितल्या आहेत. कथनात्मक साहित्यात जो एक प्रवाह अपेक्षित असतो तो प्रवाह या कथांमध्ये सहज अभिव्यक्त होतो. या पुस्तकातील वातावरण प्रामुख्याने महानगरीय आहे. काही स्त्री व्यक्तिरेखांच्या आजूबाजूचे वातावरण, त्यांच्या सभोवतालचे जग हे पूर्णतः वेगळ्या परिसरातील आहे, पण याच्याशी वाचक परिचित होतो ते सूक्ष्मतेने उलगडत गेलेल्या वर्णनामुळे.

जगण्याचं डोळस भान देणाऱ्या आणि स्त्री मनाचा तळ शोधणाऱ्या या कथा वाचकांना निश्चितच सकस वाचनाचा अनुभव देतात.

कौलं उडालेलं घर

लेखिका : प्रतिभा कणेकर
प्रकाशक: सृजनसंवाद प्रकाशन, ठाणे
पृष्ठ : 192, मूल्य ः रुपये 300/-