‘ती’ समाज मंदिरे सोलापूर महापालिका ताब्यात घेणार; आयुक्तांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या समाज मंदिरांमध्ये गैरकारभार सुरू आहे. नाममात्र भाडे आकारणी करून भाडय़ाने दिलेल्या सर्व समाज मंदिरांची मुदत संपली आहे. त्यांच्याकडून करआकारणीदेखील केली जात नाही. यासंदर्भात नगरसेवक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मुदत संपलेली सर्व समाज मंदिरे ताब्यात घेऊन चालू बाजारभावाप्रमाणे भाडेवाढ केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक रवी कैयावाले आणि विनायक विटकर यांनी सभासद प्रस्ताव दाखल करत टी. पी. 4 प्लॉट नंबर 129 मधील लक्ष्मीनगर येथील महापालिकेचे समाज मंदिर एका समाजिक संस्थेला महिलांसाठी उपक्रम आणि सपुपदेशन करण्यासाठी दरमहा चारशे रुपये दराने 29 वर्षे 11 महिने कालावधीसाठी भाडय़ाने देण्याचा प्रस्ताव केला होता. या विषयावर भाष्य करताना नगरसेवक रियाज खैरादी यांनी आतापर्यंत दिलेल्या समाज मंदिरांच्या विषयावर आवाज उठवला. महापालिकेची मोठय़ा जागेत बांधलेली समाज मंदिरे नाममात्र भाडय़ाने अनेकांनी ताब्यात घेतली आहेत. या समाज मंदिरांचा करार संपला आहे. ज्या कारणासाठी समाज मंदिर भाडय़ाने घेतले जाते त्यासाठी त्या समाज मंदिराचा वापर केला जात नाही. अनेक समाज मंदिरांचा करार संपला आहे. या समाज मंदिरांमध्ये अवैध व्यवसाय चालतात. काही समाज मंदिरांमध्ये जुगाराचे अड्डे आहेत. त्याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला आहे. याबाबतचे पुरावे देऊनही कारवाई केली जात नाही, याचा जाब त्यांनी प्रशासनाला विचारला.

97 समाज मंदिरे भाडय़ाने दिली आहेत. या सर्व समाज मंदिरांची मुदत संपली असल्याचे सहायक आयुक्त विक्रमसिंह पाटील यांनी सांगितले. त्यावर नगरसेविका करगुंळे आणि खैरादी, कामिनी आडम आक्रमक झाले. महापालिकेच्या जागेचा गैरवापर केला जात आहे. इमारतीचा टॅक्स भरत नाहीत. तरीदेखील अधिकारी कारवाई करत नाहीत. याबाबत महापालिका आयुक्तांनी खुलासा करण्याची मागणी केली असता, महापालिका आयुक्तांनी मुदत संपलेली सर्व समाज मंदिरे ताब्यात घेऊन शासनाच्या नवीन धोरणानुसार बाजार भावाप्रमाणे आकारणी करण्याचे जाहीर केले.

कनिष्ठ अभियंता बाबर यांची होणार चौकशी
बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता नागनाथ बाबर यांच्यावर कारवाई करावी असा प्रस्ताव राजेश काळे आणि अविनाश बोमडय़ाल यांनी दाखल केला होता. मात्र, सभा चालू होताच काळे यांनी महापौरांना पत्र देऊन सदरचा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली असता विरोधीपक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक रियाज खैरादी, तौफिक शेख आक्रमक झाले. अजेंडय़ावर प्रस्ताव असताना यावर चर्चा न करता सदरचा प्रस्ताव मागे घेण्याचे गौडबंगाल काय असा सवाल प्रशासनाला विचाराला. लाच घेतल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी केला आहे. यामध्ये काही तथ्य असल्याशिवाय प्रस्ताव दाखल केला आहे. मग चौकशी न करता प्रस्ताव मागे घेण्यामागे काही तरी आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. यावर महापौरांनी बाबर यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले.