लडाख सीमेवर चीनचा हायवे! मिसाईल आणि रॉकेट रेजिमेंटही तैनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या सीमेवर चीनच्या नवनव्या कुरापती सुरूच आहेत. अरुणाचल प्रदेशच्या हद्दीत अख्खे गाव वसवल्यानंतर आता पूर्व लडाखमध्ये एलएसीजवळ महामार्गाच्या बांधकामाला गती दिली आहे. याशिवाय मिसाईल व रॉकेट रेजिमेंट तैनात करून हिंदुस्थानला डिवचण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. चीनच्या अशा कुरापतींमुळे हिंदुस्थान-चीनमधील तणाव आणखी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

एकीकडे हिंदुस्थानबरोबरचा सीमावाद सामोपचाराने मिटवण्यास तयार असल्याचा दिखावा चीनकडून केला जात आहे. याचदरम्यान सीमाभागात नवनव्या कुरापतींचा धडाका चीनने लावला आहे. त्यामुळेच चर्चेच्या अनेक फेऱया होऊनही हिंदुस्थान-चीन तणाव धगधगता राहिला आहे. चीनी सैन्याला एलएसीवर लगेच पोहचता यावे, या कुटनितीने चीनने पूर्व लडाख प्रांताच्या समोर असलेल्या अक्साई चीन भागात महामार्गाचे बांधकाम सुरू केले आहे आणि तिबेट स्वायत्त प्रदेशात मिसाईल व रॉकेट रेजिमेंट मोठया संख्येने तैनात केल्या आहेत. तसेच आश्रयस्थानेही बांधली असून सीमेवर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनच्या तैनाती वाढवल्या आहेत. याशिवाय काशगर, गर गुंसा व होटन येथील मुख्य तळांव्यतिरिक्त महामार्गांचे रुंदीकरण आणि नवीन एअर स्ट्रिप बनवण्याचे काम सुरू केले आहे.

तिबेटच्या सैनिकांची तैनाती वाढवली

चीनने पूर्व लडाखमधील एलएसीवर तिबेटच्या सैनिकांचीही तैनाती वाढवली आहे. या परिसरात चीनच्या सैन्याला राहणे मुश्किल बनले होते. त्याच अनुषंगाने तिबेटी लोकांची भरती करून त्यांना मुख्य भूभागावरील हान सैन्यासह सीमा चौक्यांवर तैनात करण्याचा चीनी सैन्याचा प्रयत्न आहे.

चीनच्या बांधकामांवर हिंदुस्थानचा तीव्र आक्षेप’

एलएसीजवळ लष्करी पायाभूत सुविधा अपग्रेड करण्यासाठी चीन वारेमाप पैशांची गुंतवणूक करीत आहे. सीमा भागात वसाहती तसेच रस्ते, महामार्गांचे बांधकाम करण्याचा धडाका चीनने लावला आहे. त्यावर हिंदुस्थानने तीव्र आक्षेप घेतला आहे. हिंदुस्थान-चीनमध्ये नुकत्याच झालेल्या चर्चेवेळी हिंदुस्थानने सीमाभागातील चीनच्या अशा बांधकामांवर तीव्र चिंता व्यक्त केली.